भारतात १९९६साली आयोजित केलेली क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ही भारतातील दुसरी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा. या आधी भारताने १९८७ साली रिलायन्स विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. १९८७ साली झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारताने साखळी स्पर्धेत सहज सुंदर कामगिरी केली खरी; पण महत्त्वाच्या उपांत्य सामन्यात बेफिकीर बॅटिंगमुळे सामना गमावला. मी पत्रकार या नात्याने १९९६ साली आयोजित केलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे वार्तांकन केले.
तत्पूर्वी मुंबईत अधिस्वीकृती मिळालेल्या क्रीडा पत्रकारांसाठी या वर्ल्ड कपमधील वार्तांकन अनुषंगाने एक कार्यशाळा ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथमच संगणकाचा मर्यादित वापर प्रेस बॉक्स मधून झाला.या विश्वचषक स्पर्धेचे वार्तांकन करणाऱ्या सर्वात कमी वयाच्या पत्रकारांपैकी तेव्हा मी एक होतो. स्पर्धेत मी एकूण तीन सामने कव्हर केले. या स्पर्धेतील सर्वात पहिला उद्घाटनाचा सामना होता इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड. हा सामना अहमदाबादला मोटेरा येथे झाला. त्यावेळी मोटेरा स्टेडियमचा मोठा भाग बऱ्यापैकी अनकव्हर्ड होता. नुकताच निवृत्त झालेला कपिलदेव पत्रकार कक्षात काही काळ आला असता त्याच्याशी अल्प बातचीत देखील करण्याची संधी मिळाली. बॉयकॉट व टोनी ग्रेग हे ब्रिटिश दिग्गजसुद्धा या सामन्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांद्वारे उपस्थित होते. त्या दोघांबरोबर सुद्धा गप्पा मारता आल्या.
केनियाने चक्क विंडीजला धोपटले!
पुण्यात झालेला केनिया विरुद्ध वेस्ट इंडिज हा सामनादेखील मी कव्हर केला. हा एक ऐतिहासिक सामना ठरला. त्यावेळी केनिया क्रिकेटची अवस्था आजच्यापेक्षा खूप चांगली होती तरीपण वेस्ट इंडिजसारख्या त्याही वेळी बलवान समजल्या जाणाऱ्या संघास ते पराभूत करतील असे वाटले नव्हते.वेस्ट इंडिज संघात रिची रिचर्डसन, वॉल्श, अम्ब्रोज, लारा अशी बडी नावे होती. अशा या बलवान संघास केनिया सारख्या नवख्या व अननुभवी संघ हरवेल, अशी कुणालाही अपेक्षा नव्हती. सामन्याच्या दिवशी सकाळी काही काळ वेस्ट इंडिज संघाचा सराव बघितल्याचे आठवते. त्यावेळी वेस्ली हॉल वेस्ट इंडिज संघाचे व्यवस्थापक होते. हॉल, होल्डींग रॉबर्ट्स ही जुनी मंडळीदेखील जवळून बघता आली.
केनिया संघाचे सारे खेळाडू हौशी होते, त्यांच्यापैकी काही जण तर नियमित नोकरी देखील करीत. केनियाच्या संघ व्यवस्थापनाने एक स्मरणिका देखील प्रकाशित केली होती. केनियाच्या बऱ्याच खेळाडूंच्या सह्या घेतलेली ती स्मरणिका आजही माझ्या संग्रहात आहे. केनियाने त्या सामन्यात मिळविलेल्या ऐतिहासिक विजयामुळे माझ्यासाठी ती स्मरणिका एक विशेष आठवण आहे.
भारत-पाक सामन्याचा संस्मरणीय थरार!
याच स्पर्धेतील मी कव्हर केलेला तिसरा आणि कायमस्वरूपी स्मृती कोंदणात कोरला गेलेला सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान हा उपांत्यपूर्व सामना. हा सामना बंगळूरू येथे झाला. त्यावेळी डिजिटल कॅमेरे अथवा मोबाईल फोन नव्हते. माध्यमकर्मीनी कॅमेरा रोल वापरूनच फोटो काढले. माझ्याकडे आजही त्या २८ वर्षांपूर्वी झालेल्या सामन्याचे फोटो रोल जपून ठेवले आहेत. त्या सामन्यासाठी मी, ज्येष्ठ पत्रकार द्वारकानाथ संझगिरी व लोकसत्ताचे तत्कालीन क्रीडा संपादक विनायक दळवी मुंबईहून निघताना विमानात बरोबर होतो. माझा तो केवळ दुसरा विमान प्रवास! त्या सामन्याच्या पूर्वसंध्येला दोन्ही संघांचा सराव बघण्याची संधी आणि अनेक जुन्या दिग्गज खेळाडूंबरोबर गप्पा मारता आल्या. पैकी सुनील गावसकर यांच्या बरोबर झालेली बातचीत अर्थातच संस्मरणीय.
पाकिस्तानचे इमरान खान, वसीम अक्रम आदी खेळाडू खास या सामन्यासाठी आले होते, इंतीखाब आलम पाकिस्तानचे व्यवस्थापक होते. भारत-पाकिस्तान लढत तीही वर्ल्डकपमध्ये त्यामुळे देशाचेच नव्हे तर साऱ्या क्रिकेट जगताचे लक्ष या लढतीकडे. वेंकटेश प्रसाद व सईद अन्वर ही सर्वांनी बघीतलेली चकमक ‘याचि देही याचि डोळा’ बघायची संधी मला मिळाली होती! सामना संपल्याक्षणी मैदानातून खेळाडूंबरोबर कॅमेऱ्यात टिपलेले ते क्षण खासच होते.फक्त सामना संपल्यावरच्या एका तासात मी ३६ फोटोंचा एक रोल पूर्ण संपविला होता. सामना संपल्यावर विजयी कर्णधार अझरुद्दीनची साऱ्या पत्रकारांच्या गर्दीत घेतलेली मुलाखत एका हातात रेकॉर्डर आणि एका हातात कॅमेरा अशी कसरत करीत घेतली
होती !!!
होती !!!
दिग्गजांचा सहवास संस्मरणीय!
सामना संपल्यावर प्रेस बॉक्समध्ये सचिन तेंडूलकर व सलील अंकोला आल्याचे स्मरते. प्रेस बॉक्ससमोरच काही फूट अंतरावरून टोनी ग्रेगना लाईव्ह बघितले!! काय आवाज होता या माणसाचा!! त्यावेळी मोबाईल फोन नव्हते. पत्रकार कक्षात लँडलाईन फोनची सोय करून देण्यात आली होती. जगातील क्रमांक एकचा क्रिकेट फोटोग्राफर पॅट्रिक इगरशी याच सामन्यादरम्यान छान ओळख झाली. सामना संपल्यावर मग पत्रकार कक्षातील फोन फारच डिमांडमध्ये आले!! त्यादिवशी स्टेडियम मधून बाहेर पडताना मला रात्रीचे १२ वाजले. हॉटेल वर जायला कुठले वाहन मिळेना. शेवटी विजयोत्सव साजऱ्या करणाऱ्या काही तरुणांनी गाडीत लिफ्ट दिली. त्यांच्या आरडाओरडा व मस्तीत धक्का लागून मित्राचा उसना आणलेला कॅमेरा खाली पडला, कॅमेऱ्याचे थोडे नुकसान पण झाले. संपूर्ण शहरातच काय साऱ्या भारतात त्या रात्री जल्लोषाचे वातावरण होते. माझ्या क्रीडा पत्रकारितेच्या कारकिर्दीतील तो एक कधीही विसरला जाणार नाही, असा संस्मरणीय असा हा सामना होता..!
लेखक : नितीन मुजुमदार
लेखक क्रिकेट व क्रीडा विषयक तज्ज्ञ आहेत.