आयसीसी विश्वकरंडक स्पर्धा सुरू झाली आणि क्रिकेट जगतात उत्साहाला उधाण येऊ लागले आहे. रोमांचक सामने आणि संस्मरणीय ठरणाऱ्या क्षणांची चाहते आतुरतेने प्रतिक्षा करत असतात. पण पडद्यामागे आणखी एक पैलू असा असतो, की त्याविषयी कोणाला माहिती नसते. पण सर्वांना आकर्षित करतो, तो म्हणजे स्पर्धेचे बजेट किंवा स्पर्धेत दिली जाणारी रोख रकमेची बक्षिसे. फुटबॉलच्या विश्वकरंडक स्पर्धेत दिल्या जाणाऱ्या बक्षिसांशी तुलना करता क्रिकेटला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे, हे जरी खरे असले तरी एक उत्सुकता म्हणून दोन्ही खेळांतील बक्षिस रकमेच्या आकडेवारीवर नजर टाकायला काय हरकत आहे….!
फुटबॉल आणि क्रिकेट हे दोन्ही खेळ जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ समजले जातात. क्रिकेट हा जरी फुटबॉलच्या तुलनेत मोजक्या देशांमध्येच खेळला जात असला, तरी सर्वच देशांना हा खेळ आकर्षित करत आला आहे. त्यामुळेच तर नेपाळपासून जागतिक महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेतही क्रिकेटला खतपाणी मिळत आहे. क्रिकेट खेळणाऱ्या देशांची संख्या आता वीसवर पोहोचली आहे. पण, एक गोष्ट नक्की, की २०० पेक्षा अधिक देशांत खेळला जाणारा फुटबॉल वेग, चपळता, वेळ, उत्कंठता अशा सर्वच बाबतीत क्रिकेटला भारी पडतो हे नाकारता येणार नाही. एवढेच नाही, तर बक्षिस रकमेच्या बाबतीत तर श्रीमंत खेळ म्हणून गणला जाणारा क्रिकेटचा खेळ फुटबॉलच्या तुलनेत अजूनही जमिनीवरच रांगत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कोणाचेही डोळे दीपतील अशा पद्धतीने फुटबॉलच्या खेळातील संघ आणि खेळाडू धनवर्षावात न्हाऊन निघतात. केवळ पुरूष फुटबॉल संघच नव्हे, तर फिफा विश्वकरंडक महिला फुटबॉल स्पर्धेतील विजेता संघही विश्वविजेत्या क्रिकेट संघाच्या तुलनेत काकणभर सरसच ठरतो.
महिला फुटबॉलही श्रीमंत
महिलांच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतीलही बक्षिस रक्कम आयसीसी पुरूष क्रिकेट विश्वकरंडक आणि ट्वेंटी-२० विश्वकरंडकापेक्षाही अधिक असते. याच वर्षी झालेल्या फिफा महिला फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेत विजेतेपद पटकाविणाऱ्या स्पेनच्या संघाला करंडकासह ३५.६७ कोटी रूपयांचे बक्षिस मिळाले. त्याचवेळी उपविजेत्या संघाला २५.०७ कोटींचे बक्षिस देण्यात आले. या स्पर्धेसाठी एकूण ९१४ कोटींची बक्षिसे ठेवण्यात आली होती. तिसऱ्या क्रमांकाच्या संघाला २१ कोटी, चौथ्या क्रमांकावरील संघाला २० कोटींचे बक्षिस दिले जाते. त्यामुळे महिला फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेसमोरही आयसीसी पुरूष क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेतील बक्षिस रक्कम तग धरू शकत नाही.
या सर्वामध्ये एक गोष्ट नमूद करावी लागेल, की फुटबॉलमध्ये दर चार वर्षांनी एकदाच विश्वकरंडक स्पर्धा आयोजित केली जाते. मात्र, क्रिकेटमध्ये एकदिवसीय, ट्वेंटी-२० या दोन विश्वकरंडक स्पर्धांबरोबरच चॅम्पियन्स करंडक आणि आता साखळी पद्धतीने कसोटी चॅम्पियनशीपही आयोजित केली जाते आणि या सर्व स्पर्धांची बक्षिस रक्कमही फिफाच्या एका विश्वकरंडक स्पर्धेच्या जवळपासही पोहोचत नाही. खेळातील पैसा, खेळाची व्याप्ती, प्रेक्षक संख्या आणि कमाईच्या बाबतीत फुटबॉल क्रिकेटपेक्षाही सरसच ठरतो.
साखळीतून बाहेर पडलेल्या संघांनाही मिळते दुप्पट रक्कम
तुम्हाला माहिती आहे का, की फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या गटसाखळीतच बाहेर पडणाऱ्या संघाला जेवढे पैसे मिळाले होते, त्याच्या निम्म्यापेक्षाही कमी रक्कम विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्याला मिळते. हे दोन्ही आकडे विश्वकरंडक फुटबॉल आणि विश्वकरंडक क्रिकेट यांच्यामधील दरी स्पष्ट करते. भारतातील परिस्थिती वेगळी आहे. भारतात क्रिकेटची पूजा होते आणि फुटबॉल पाहण्यासाठी आवाहन करावे लागते. पण, भारतासारखे राष्ट्रकुल देश सोडले तर फुटबॉलची लोकप्रियता क्रिकेटपेक्षा कितीतरी अधिक आहे.
फुटबॉलमध्ये दिल्या जाणाऱ्या बक्षिस रकमेवर नजर टाकली, तर ट्वेंटी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या एकूण बक्षिस रकमेएवढी रक्कम फिफा फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेत केवळ सहभागी होणाऱ्या एका संघाला दिली जाते. विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेची एकूण बक्षिस रक्कम सुमारे ३६०० कोटी रूपये आहे. विश्वविजेत्या संघाला ३४४ कोटी रूपये दिले जातात, तर उपविजेत्या संघाला २४५ कोटी रूपये मिळतात. उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी २२० कोटी रूपये मिळाले. पाचव्या ते आठव्या स्थानांवरील संघांना १३८ कोटी, नवव्या ते सोळाव्या स्थानांवरील संघांना १०६ कोटी, तर १७ ते ३२ व्या स्थानांपर्यंतच्या संघांना ७४ कोटी रूपये दिले गेले आहेत.
२०२२ मध्ये खेळल्या गेलेल्या फुटबॉल विश्वकरंडक आणि ट्वेंटी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या बक्षिस रकमेचा विचार करता या दोन्ही स्पर्धांतील विजेत्यांच्या बक्षिस रकमेत तब्बल २६ पटींचे अंतर आहे. दोन्ही स्पर्धांच्या एकूण बक्षिस रकमेत ३५३९.३२ कोटी रूपयांचे अंतर आहे. फिफा विश्वकरंडक स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक संघाला १२.४५ कोटी रूपये दिले गेले. त्याचवेळी ट्वेंटी-२० विश्वकरंडक जिंकणाऱ्या संघाला केवळ १.६ कोटी रूपये मिळाले. २०१९ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या विश्वकरंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी एकूण बक्षिसांची रक्कम ८२.७० कोटी रूपये होती, तर २०२२ मधील विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी हीच रक्कम ३६४० कोटी रूपये होती.
२०१९ मध्ये खेळल्या गेलेल्या आयसीसी विश्वकरंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाला ३३.२६ कोटी रूपये मिळाले होते, जी आतापर्यंतच्या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक बक्षिस रक्कम ठरली होती. उपविजेत्या संघाला १६.४४ कोटी, उपांत्य फेरीतील पराभूत संघांना ६.५७ कोटी, साखळी फेरीत जिंकलेल्या प्रत्येक सामन्यासाठी ३३ ते ३५ हजार रूपयांचे, तर साखळी फेरीतच पराभूत झालेल्या संघांना प्रत्येकी ८३ लाखांचे बक्षिस दिले गेले होते.
कसोटी चॅम्पियनशीपमधील विजेत्या संघाला १३.२ कोटी, उपविजेत्या संघाला ६.५९ कोटी, तिसऱ्या स्थानासाठी ३.७ कोटी, चौथ्या स्थानासाठी २.८ कोटी, पाचव्या स्थानासाठी १.६४ कोटी, सहाव्या, सातव्या, आठव्या आणि नवव्या स्थानावरील संघासाठी प्रत्येकी ८२ लाख रूपयांचे बक्षिस दिले जाते. कसोटी चॅम्पियनशीपसाठी बक्षिसांची एकूण रक्कम ३१.३२ कोटींच्या घरात असते.
२०२२ मध्ये खेळल्या गेलेल्या ट्वेंटी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील विजेत्या संघाला १३.०५ कोटी, तर उपविजेत्या संघाला ६.५२ कोटी रूपये मिळाले. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन संघांना प्रत्येकी ३.२२ कोटी, तर सुपर १२ टप्प्यात बाहेर पडलेल्या आठ संघांना प्रत्येकी ५६.३५ लाख रूपये मिळाले. या स्पर्धेसाठी एकूण ४५.६८ कोटींची बक्षिसे ठेवण्यात आली होती. आयसीसीच्या चौथ्या मोठ्या स्पर्धेसाठी, चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी एकूण बक्षिसांची रक्कम ३७.३० कोटी रूपये एवढी असते. आठ संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेतील विजेत्या संघाला १८.२३ कोटी रूपये, तर उपविजेत्या संघाला ९.११ कोटी रूपयांचे बक्षिस मिळते. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना प्रत्येकी ३.७३ कोटी रूपयांच्या आसपास रक्कम मिळते.
आयपीएलची बक्षीस रक्कम आयसीसी स्पर्धांपेक्षा जास्त
इंडियन प्रिमियर लीग ही स्पर्धा फक्त भारतातच खेळविली जाते आणि त्याकडे केवळ एक कार्पोरेट स्पर्धा म्हणून बघितले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा या स्पर्धेशी काही संबंध नसतो. पण, या स्पर्धेच्या बक्षिस रकमेवर नजर टाकली, तर विजेत्याला २० कोटी, उपविजेत्याला १३ कोटी, तिसर्या स्थानावरील संघाला ७ कोटी आणि चौथ्या स्थानावरील संघाला ६.५ कोटींचे बक्षिस दिले जाते. सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी वैयक्तिक खेळाडूंना १२ ते २० लाखांची बक्षिसे दिली जातात. तसं पाहायला गेलं तर या स्पर्धेची बक्षिस रक्कमही आयसीसीच्या कुठल्याही स्पर्धेपेक्षा अधिक आहे. मात्र, फुटबॉलच्या तुलनेत काहीच नाही.
आयसीसीपेक्षाही सर्वाधिक श्रीमंत क्रिकेट मंडळ म्हणून उल्लेख केला जात असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे अर्थात भारताकडे यंदाच्या एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी आहे. या स्पर्धेसाठी सुमारे २ हजार कोटी रूपये खर्च केले जातील असा अंदाज आहे. त्यापैकी जवळपास १५०० कोटी रूपये एवढा हिस्सा बीसीसीआयच्या खांद्यावर असणार आहे. या खर्चाशिवाय बीसीसीआयकडून आयसीसीला यजमानपदाचे शुल्कही अदा करावे लागणार आहे. हे शुल्क जवळपास २०० कोटींच्या आसपास असेल. स्पर्धेच्या आयोजनातून बीसीसीआयला काही महसूल मिळेल, जसे तिकिट विक्री, प्रक्षेपण हक्क आणि प्रायोजक. तरीही या महसुलातून स्पर्धेच्या आयोजनाचा खर्च भागण्याची शक्यता फारच कमी वाटत आहे. त्यामुळे बीसीसीआयला सुमारे ५०० कोटींचे नुकसान सोसावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर सरकारने टॅक्स माफ केला, तर नुकसानीचा आकडा २०० कोटींवर येऊ शकतो. अशा परिस्थितीत बक्षिस रक्कमेवरही परिणाम पडू शकतो.
काही रोचक माहिती..!
- क्रिकेटच्या विश्वकरंडकाच्या तुलनेत फुटबॉल विश्वकरंडकमध्ये तिप्पट जास्त देश भाग घेतात.
- जर पात्रता फेरीचा विचार केला, तर ही दरी आणखी रूंदावते. नुकत्याच झालेल्या फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेच्या पात्रता फेरीत तब्बल २११ देशांनी भाग घेतला होता आणि प्रत्यक्षात ३२ संघांमध्ये विश्वकरंडकासाठी संघर्ष झाला होता. तर २०१९ च्या क्रिकेट विश्वकरंडकमध्ये दहा संघ सहभागी झाले होते.
- फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेची सुरूवात १९३० मध्ये झाली होती. त्यानंतर ४५ वर्षांनी म्हणजे १९७५ मध्ये पहिली विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा खेळली गेली.
- क्रिकेटच्या विश्वकरंडक स्पर्धेपेक्षा १०० पटींनी अधिक एका विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतून रेव्हेन्यू मिळतो.
- विश्वकरंडक क्रिकेटच्या तुलनेत फिफा विश्वकरंडक स्पर्धेचा खर्च जवळपास १६० पटींनी जास्त असतो.
- विश्वकरंडक क्रिकेटच्या तुलनेत विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या सामन्याचे तिकिट सुमारे पाच पटींनी अधिक असते.
- विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतून ४० हजार कोटींची, तर विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतून सुमारे ३०० कोटींची कमाई होते.
लेखक : नीलवेदा
लेखक ज्येष्ठ पत्रकार व क्रीडा तज्ज्ञ आहेत.