थॅंक यू कपिल; थॅंक यू टीम इंडिया!

१९८३ चा जल्लोष आजही अंगावर शहरे आणतो

आपल्या देशाच्या इतिहासात असे काही मोजकेच क्षण आहेत, ज्यावेळी संपूर्ण देशाने यशाच्या क्षणी उत्स्फूर्तपणे एका सुरात, एका तालात आंदोत्सव साजरा केला असेल. ज्यावेळी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन, लहान-थोर, श्रीमंत-गरीब, शिक्षित-अशिक्षित, राजकारणी-सामान्य माणसांनी एकत्रितपणे देशाच्या यशाचा आनंद एकदिलाने साजरा केला असेल! अगदी ताजे उदाहरण द्यायचे झाल्यास चांद्रयान मोहिमेचे देता येईल. देशातील प्रत्येक नागरिक मोठ्या उत्सुकतेने चांद्रयानाचे चंद्रावर ‘सॉफ्ट लॅंडिंग’ व्हावे यासाठी श्वास रोखून वाट पाहत होता. जेव्हा शास्त्रज्ञांच्या या प्रयोगाला यश मिळाले, तेव्हा सारा देश एकसंघ होऊन आनंदोत्सव साजरा करत होता. कारगिल युद्धातील विजय, पराक्रमी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान याची सुटका, शत्रू राष्ट्राला धडकी भरविणारा भारतीय सेनेचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ अशा क्षणांबरोबरच रिओ ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधुने रजत पदक आणि टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतील नीरज चोप्राचे सुवर्णपदक या यशाच्या क्षणीही भारतीय नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला.

४३ वर्षांपूर्वीही असाच बेभान आनंदोत्सव!

वर उल्लेख केलेल्या क्षणांच्या आधी अनेक वर्षांपूर्वी असा बेभान आनंदोत्सव संपूर्ण देशाने साजरा केला होता. क्रिकेट रसिक आनंद आणि जल्लोषात बुडून गेला होता. तो काळ होता ९ जून ते २५ जून १९८३.. नाही.. नाही.. हे ओळखायला काही बक्षीस वगैरे मिळणार नाही! अहो तुम्हाला नक्कीच माहिती असणार विश्वचषकतील कपिलच्या चमुची ती अविस्मरणीय कामगिरी. नाही का?
१९८३ चा विश्वचषक सुरू होण्यापूर्वी आपल्यापैकी कोणीही भारतीय संघ या विश्वचषकाच्या १७ दिवसांच्या कालावधीत असा काही चमत्कार करेल, याची साधी कल्पनाही केलेली नव्हती. या आधी झालेल्या दोन विश्वचषक स्पर्धेप्रमाणेच आपला संघ या स्पर्धेत नेहमीप्रमाणे फक्त हजेरी लावून येणार अशीच बहुतेकांची भावना होती. नेहमी प्रमाणे वेस्टइंडिज दादागिरी करणार, त्यांना ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड थोडीफार टक्कर देणार असाच बहुतेकांचा होरा होता. नवीन कर्णधार, कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीत उत्तम पण जोरदार फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजांचा अभाव, (काही सन्माननीय अपवाद वगळता) आणि बऱ्यापैकी मध्यमगती गोलंदाजी अशा आपल्या संघाकडून कुणी फारशा अपेक्षा केलेल्या नव्हत्या. त्यातही हा विश्वचषक इंग्लंडमधील वातावरणात आणि हिरव्यागार खेळपट्टीवर होणार असल्याने या स्पर्धेला कोणी गांभीर्याने घेतलेही नव्हते; मात्र आक्रीत घडले!

आशेचा पहिला किरण 

स्पर्धेला सुरुवात झाली आणि आपल्या पहिल्याच लीग सामन्यात भारताने दोन वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्टइंडिज संघावर ३४ धावांनी विजय मिळविला आणि भारतीय क्रिकेट रसिकांच्या आनंदाला एकदम उधाण आले. इंग्लंडमधील वातावरणात, हिरव्या खेळपट्टीवर बलाढ्य विंडीज संघाला धूळ चारल्याने भारतीय संघाचे मनोबल एकदम आकाशाला भिडले असणार. या विजयाने भारतीय संघाला आपल्यातील ताकदीची कल्पना आली आणि आपण केवळ पर्यटनासाठी येथे आलेलो नसून सर्वोत्तम संघालाही आपण नमवू शकतो, हा आत्मविश्वासही त्यांना या विजयाने दिला.

जिकण्याची जिद्द आणि क्षमता 

१७ धावांमध्ये ५ गडी बाद अशा दयनीय अवस्थेत संघ असताना कर्णधार कपिल देवची नाबाद १७५ धावांची खेळी या विश्वचषकातील अनमोल क्षण होता. विचार करा, जेव्हा चेंडू हवेमध्ये हालत होता आणि जमिनीवर पडल्यानंतरही वळत होता, आघाडीचे पाचही फलंदाज एका मागे एक तंबूत परतले असताना कर्णधार कपिल काय आत्मविश्वासाने मैदानात उतरला असेल! सगळ्या संघाची जाबाबदारी एकट्याने आपल्या खांद्यावर उचलताना कपिलने या सामन्यात झिंम्बाब्वे संघातील गोलंदाजांचे वाभाडे काढले. अवघ्या १३८ चेंडूत १६ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद १७५ धावांची झंझावाती खेळी केली. हा त्या वेळेसचा विश्वविक्रम होता. असे असले तरी आम्ही क्रिकेटप्रेमी जरासे कम नशिबीच ठरलो, कारण नेमक्या याच दिवशी BBC कर्मचाऱ्यांच्या संपामुळे या सामन्याचे प्रक्षेपण झाले नाही. त्यामुळे आजही त्याचे रेकॉर्डिंग उपलब्ध नसल्याने ही खेळी पाहता येत नाही. या नंतरच्या विश्वचषक स्पर्धांमध्ये अनेक फलंदाजांनी ढीगभर धावा केल्या असतील; मात्र आमच्यासाठी आजतागायत कपिलची ही इनिंग एकमेवाद्वितीय अशीच आहे.
त्यानंतर २० जून १९८३ रोजी झालेल्या आणखी एका लीग मॅचमध्येऑस्ट्रेलियाला ११८ धावांनी दिलेली मात भारतीय संघाच्या आत्मविश्वासाला कुठच्या कुठे घेऊन गेली. मदनलाल आणि रॉजर बिन्नी सारख्या गोलंदाजांनी इंग्लिश खेळपट्टयांचा असा काही उपयोग करून घेतला की, आपण चमत्कार करू शकतो याचा अंदाज संघाला आला. या दोन सामन्यांमुळे देशवासीयांना नक्कीच आपणही या विश्वचषकाचे दावेदार बनू शकतो, असा आशेचा किरण दिसला असणार. त्या नंतरचे सहा दिवस (२० जून ते २५ जून) संपूर्ण देश काहीतरी भव्य घडतंय याचा अनुभव घेण्यासाठी दिव्य यशाच्या आशेने एकजूट होऊन क्रिकेटमय झाल्याचे दिसत होते.
त्यावेळी मोबाईल फोन, फेसबुक, व्हॉटस् अप् असा सोशल मीडिया तर नव्हताच; पण टीव्हीसारखे माध्यमही सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसांच्या आवाक्यात नव्हते. तेही बहुतेक ब्लॅक अँड व्हाईट आणि त्यासाठी अॅन्टीनाची करावी लागणारी जुळवाजुळव ही कसरत असायची. असे जरी असले तरी क्रिकेटप्रेमींचा उत्साह, जोश पाहण्यासारखा होता. मोठी महानगरे, शहरांपासून ते अगदी खेड्यांपर्यंत क्रिकेटप्रेमी गटा-गटांनी एखाद्या टीव्हीसमोर किंवा रेडिओसमोर जमून सामन्याचा आनंद घेताना दिसत होते. टीव्हीवरील बातम्या आणि वर्तमानपत्रांमध्ये विश्वचषकाच्या बातम्यांचा पूर आला होता. आपले फलंदाज फॉर्मात होते, गोलंदाजही इंग्लंडमधील वातावरणाचा पुरेपूर फायदा उठवत होते, यातच उपांत्य सामन्यात भारताने इंग्लंडला पराभूत केले आणि……

…. आणि आला अत्युच्च आनंदाचा क्षण 

वेस्ट इंडिजविरुद्ध फायनल……. भारतीय संघ चांगली कामगिरी करत असला तरी, भारतीयांच्या मनात धाकधूक होतीच, भीती आणि चिंता सतावत होतीच. शेवटी गॉर्डन ग्रीनिज, डेसमंड हेन्स, क्लाइव्ह लॉईड, लॅरी गोम्स आणि या सर्वात भारी सर व्हिव्ह रिचर्ड्स यांच्यासारख्या जबरदस्त बॅटिंग ऑर्डरचा सामना आपल्या गोलंदाजांना करावा लागणार होता. त्यांच्याकडे अँडी रॉबर्ट्स, जोएल गार्नर, माल्कम मार्शल आणि मायकेल होल्डिंगसारख्या वेगवान गोलंदाजांची पॉवरफूल बॅटरी होती. त्यातच साखळी फेरीत भारताकडून पराभव स्वीकारावा लागला असल्याने आणखीनच हा संघ धोकादायक जाणवत होता.
सामना सुरू झाला.  भारताला तितकी चांगली फलंदाजी करता आली नाही. भारतीय संघ केवळ १८३ धावा करू शकला. वेस्ट इंडिजच्या 1 बाद 50 धावा झाल्या होत्या, तेव्हा व्हिव्ह रिचर्ड्स ज्या तडफेने खेळत होता ते पाहता वेस्टइंडिज आरामात जिंकणार असे वाटत होते. पण अचानक ट्विस्ट आला, जेव्हा कपिल देवने पाठीमागे अनेक यार्ड धावत जाऊन व्हिव्ह रिचर्ड्सचा एक अप्रतिम झेल पकडला. काय झेल होता तो…! सामन्यातील स्पष्टपणे एक निर्णायक क्षण. माझ्यासाठी, विश्वचषकाच्या इतिहासात घेतलेला हा आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल होता, केवळ अॅथलेटिक कौशल्यासाठीच नाही, तर कर्णधाराने हा झेल ज्या परिस्थिती आणि दबावाखाली घेतला होता, त्याला तोड नाही.
त्यानंतर भारतीय संघाने मागे वळून पाहिले नाही. विंडीजच्या फलंदाजांना एका मागे एक तंबूत धाडताना माजी विश्व विजेत्यांना केवळ १४० धावांमध्ये गुंडाळून विश्वचषकावर आपले नाव कोरले. भारतीयांच्या या यशात जबरदस्त टीमवर्कचा हात होताच पण; कर्णधार कपिलसह, यशपाल शर्मा, मोहिंदर अमरनाथ हे या  विश्वकप स्पर्धेतील महत्त्वाचे खेळाडू ठरले. मोहिंदरने या स्पर्धेत २३७ धावा आणि मोक्याच्या क्षणी ८ बळी टिपले. त्याला उपांत्य आणि अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरविण्यात आले. रॉजर बिन्नी सर्वाधिक बळी मिळविणारा गोलंदाज ठरला.

भारतातील रस्ते मध्यरात्री ‘ओव्हर फ्लो’

भारताने वर्ल्डकप जिंकल्याची बातमी आली आणि संपूर्ण भारतातील क्रिकेट रसिक आनंदाने बेभान होऊन रस्त्यावर उतरले. चैतन्याने भरलेल्या अवस्थेत लाखों भारतीय क्रिकेट रसिक हातात तिरंगा झेंडा घेऊन वेड्यासारखे नाचत होते. क्रिकेटप्रेमींच्या जल्लोषाने सगळे वातावरण भारावून टाकले होते. केवळ भारताने विश्वकप जिंकला नव्हता, तर क्रिकेट जिंकले होते.  या विश्व विजयानंतर भारतीय संघाकडे बघण्याचा जागतिक क्रिकेटमधील दिग्गजांचा दृष्टिकोनच बदलला. भारतीय संघाला एक मानाचा दर्जा मिळाला. इतर संघ भारतीय संघाकडे आदराने पाहू लागले. नंतरच्या काळात भारतीय संघाने २०११ च्या विश्वचषकासह ज्या यशाच्या अनेक पायऱ्या पादाक्रांत केल्या, त्याचा १९८३ चा विश्वविजय हा पाया होता. आणि हा पहिला विश्वविजय नेहमीच भारतीयांसाठी ‘स्पेशल’ असणार आहे. कायम स्मरणात राहणारा असेल यात शंका नाही. या गौरवशाली विजयाने आमची छाती अभिमानाने भारण्यासाठी आणि अनमोल आनंदाचे क्षण आमच्या वाट्याला आणल्याबद्दल  ‘थॅंक यू कपिल देव आणि टीम इंडिया’

                                                                                          लेखक : भालचंद्र जोगळेकर 

                                                                                    लेखक माजी रणजीपटू व प्रशिक्षक आहेत. 
See also  मनू भाकरची अंतिम फेरीत धडक