सेहवागचे चिमटे अन् सचिनची तंबी!

२०११ अजिंक्यपदाचा हॅंगओव्हर..!

क्रिकेट विश्वचषक म्हटलं की दोन आठवणी आपल्या भारतीयांच्या मनावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. १९८३ चा विजय आणि तब्बल 28 वर्षांनंतर २०११ चा विजय. यंदा २०२३ च्या विश्वचषकाचे संपूर्ण यजमानपद भारताकडे सुपूर्द करण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय संघावर २०११ ची जादू परत सत्यात आणण्यासाठी चांगलाच दबाव असणार आहे; मात्र ही सुवर्णसंधी भारतीय संघाला १२ वर्षांनी परत मिळाली आहे.

२०११ चा विश्वचषक म्हटला की प्रकर्षाने आठवणाऱ्या काही गोष्टी म्हणजे, विजयी षटकार मारल्यावर धोनीची चेंडूकडे पाहणारी ती स्थिर नजर … त्याची ती विशिष्ट दिमाखदार तऱ्हेने बॅट फिरवायची अदा… युवराज सिंगच्या डोळ्यातले अनावर झालेले आनंदाश्रू … सचिन तेंडूलकरच्या चेहऱ्यावरचा परमानंद … ह्या सगळ्या आठवणी आपल्या सगळ्याच भारतीय लोकांच्या मनात एक कायमचं घर करून बसल्या आहेत ह्यात काही शंका नाही. चला तर २०२३ च्या पार्श्वभूमीवर परत एकदा २०११ च्या आठवणींना उजाळा देऊयात …

वीरेंद्र सेहवागच्या शाब्दिक खेळी

मोठी स्पर्धा असली की शाब्दिक खेळ पण आपोआप सुरू होतात. खेळाचा भागच तो शेवटी! सामना हा मैदानाच्या आधी डोक्यात चालू होतो आणि त्याचे अनावरण मैदानावर होते. बॅट आणि बॉलच्या आधी शाब्दिक चकमक आपले डाव खेळायला सुरूवात करते. २००७ च्या विश्वचषकामध्ये बांगलादेशने भारतीय संघाला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला. भारताची २०११ ची मोहीम बांगलादेशच्या सामन्यापासून सुरू होणार होती. २००७ च्या पराभवाच्या पार्श्वभूमीवरून आदल्या दिवशी प्रेसच्या लोकांशी बोलताना सेहवागला विचारले गेले, ‘उद्याचा सामन्या बद्दल काय सांगाल’, सेहवाग त्याच्या शैलीत बोलला ‘आम्ही बांगलादेशचा धुव्वा उडवू’. हे सेहवाग चे बोलणे बांगलादेशला चांगलेच झोंबले. दुसऱ्या दिवशी भारताने टॉस जिंकून फलंदाजी केली आणि तो बोलल्याप्रमाणे सेहवागने १४० चेंडूत १७५ धावा काढून बांगलादेशचा खरोखर धुव्वाच उडवून टाकला! सेहवागच्या विधानाने इरेला पेटलेले बांग्लादेशच्या खेळाडूंकडे सेहवागच्या फलंदाजी वर टाळ्या वाजवण्यापलीकडे दुसरा काहीही पर्यायच उरला नव्हता. २००७ चा वचपा सेहवागने व्याजासकट भरून काढला !

See also  सूर्या चमकला; श्रीलंकेला ४३ धावांनी नामविले

सर्व काही सचिनसाठी

सचिन तेंडूलकरचा २०११ चा शेवटचा विश्वचषक असणार होता, त्यात काही शंका नव्हती, पण २०११ पूर्वी ५ विश्वचषक खेळलेल्या सचिनला विश्वचषक विजेतेपदाचा मान नव्हता मिळाला. २००३ साली अगदी जवळ पोहचून सुद्धा निराशा पदरी पडलेली होती. ह्या वेळीस जणू संपूर्ण भारतीय संघाने सचिनला विश्वचषक जिंकून द्यायचा ध्यासच घेतला होता. आणि एकाने जरा जास्तच घेतला होता.

२०११ च्या पूर्वी युवराज सिंगची कामगिरी जरा बेताची होती आणि तो मानसिकदृष्ट्या जरा निराश होता. विश्वचषकाच्या पूर्वी त्याने सचिनकडे आपले मन मोकळे केले आणि सचिन त्याला म्हणाला, ‘बाकीची सर्व चिंता सोड हा विश्वचषक आपल्या कोणा जवळच्या खास माणसासाठी खेळ. सगळी गणितं आपोआप जुळून येतील’. तेव्हाच युवराजने मनाशी पक्के केले हा विश्वचषक सचिनसाठी खेळायचा आणि तो जिंकायचा! ‘बोले तैसा चाले’ या उक्तीप्रमाणे युवराजची कामगिरी प्रत्येक सामन्यागणिक बहरात गेली आणि तो स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. त्याने सचिनसाठी विश्वचषक जिंकायचे स्वप्न सत्यात उतरवले. अंतिम सामना जिंकल्यानंतर त्याने सचिनला मारलेली घट्ट मिठी सगळं चित्र सांगून जाते.

झहीर खानचे नवीन क्षेपणास्त्र…

झहीर खान २०११ विश्वचषक स्पर्धेत शाहिद आफ्रिदीबरोबर सर्वात जास्त बळी घेणारा गोलंदाज ठरला. भारताच्या यशात झहीर खानचा पण मोठा वाटा होता. झहीर खानने २०११ विश्वचषकामध्ये पहिल्यांदा ‘नकल बॉल’ चा उपयोग केला आणि त्यात तोच पूर्ण यशस्वी झाला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया उपांत्यपूर्व सामन्यात झहीर खानने पहिल्यांदा नकल बॉलचा उपयोग केला आणि माईक हसीला त्रिफळा बाद केले.

आपल्याला टीव्हीवर यश जितके सहज रीत्या दिसते, त्यामागे खेळाडूंची खूप वर्षांची मेहनत असते. झहीर खानने हे त्याचे क्षेपणास्त्र विश्वचषकासाठी खास राखून ठेवले होते. आणि त्याच्या आधी कधीच वापरले नाही, कारण त्याला माहिती होते की, आधी वापरले तर अभ्यास करून फलंदाज त्यावर तोडगा काढतील. ह्या बॉलचा सराव झहीर तब्बल एक वर्ष आधीपासून करत होता व त्यावर प्रभुत्व मिळवल्यावरच त्याने त्याचा उपयोग केला .

See also  गिल, सुंदर आणि ऋतुराजने गाजवला तिसरा सामना; मालिकेत आघाडी!

सचिनचे संघाला झापणे

भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना नेहमीच प्रचंड दडपणाचा असतो हे तर आपल्याला ठाऊक आहेच. २०११ च्या विश्वचषकातील सामन्याच्या वेळीस दोन्ही संघ ग्राउंडवर आले आणि सामन्यापूर्वीचा सराव चालला होता. दुपारच्या सामन्यावेळी खेळाडू साधारण ११/११.३० ला नाश्ता घेतात आणि सामन्यासाठी सज्ज होतात. त्या दिवशी काही कारणास्तव नाश्ता खेळाडूंपर्यंत पोचला नव्हता. जे असेल ते थोडं खाऊन खेळाडू सरावाला आले.

खेळाडूंमध्ये जरा निराशा होती, सचिनने हे जाणले आणि सर्वांना एकत्र बोलावले. आपण इथे क्रिकेट खेळायला आलो आहोत ते सुद्धा चांगले क्रिकेट खेळायला आलो आहोत. इथे आलेल्या सर्व लोकांना तुम्ही नाश्ता केला आहे का नाही, ह्यात त्यांना रस नाही. जी काही भूक असेल तुम्हाला ती सामन्यांमध्ये दाखवा. तुमच्या पोटातील आग तुमच्या खेळामध्ये दिसू दे! असे खडे बोल सचिनने संघाला सुनावले. आणि नंतरचा इतिहास तर आपल्याला माहीतच आहे !
२०११ चे विश्वचषक विजेतेपद हे एका सोनेरी स्वप्ना सारखे आपल्या डोळ्यांमध्ये अजरामर राहणार आहे, त्यात काही वावगे नाही. आता १२ वर्ष झाली तरी अगदी काल परवाच झाल्या सारखे सगळे अगदी स्वच्छ आठवते. आता २०२३ विश्वचषकाचे वेध लागले आहेत आणि परत एकदा भारताने आपल्या घरी करंडक आणावा आणि तमाम भारतीयांचे स्वप्न पूर्ण करावे असे वाटते.

                                                                                                        लेखक : भूषण बर्वे 

                                                                                        लेखक क्रिकेट विषयातील तज्ज्ञ आहेत. 

See also  मनू भाकर ने इतिहास घडवला!