गेल्या काही दिवसांतील क्रीडा क्षेत्रातील घडामोडी पाहिल्या, तर भारतीयांसाठी एक आश्वासक चित्र निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. क्रिकेटवर जीव ओवाळून टाकला जाणाऱ्या भारतात अन्य क्रीडा प्रकारांतील खेळाडूही आपल्या दर्जेदार कामगिरीने स्वत:चे स्थान निर्माण करीत आहेत, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही आणि म्हणूनच आपल्याला नवोदित बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंद, भालाफेकपटू नीरज चोप्रा तसेच साताऱ्याच्या मातीतून उदयाला आलेल्या पार्थ साळुंखे आणि आदिती स्वामी या तिरंदाजांनी जागतिक पातळीवर नोंदविलेल्या चमकदार यशाची ही दखल.
भारताच्या 18 वर्षीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत अग्रमानांकित नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनला दिलेली झुंज तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरली आहे. भारताच्या या युवा बुद्धिबळपटूने आपल्या उज्ज्वल भवितव्याची ग्वाहीच दिली आहे. अंतिम सामना तिसऱ्या दिवसापर्यंत रंगला होता. पहिल्या दोन दिवसांतील डाव बरोबरीत सुटल्यानंतर तिसऱ्या आणि निर्णायक डावात आर. प्रज्ञानंदने सुरुवातीला आघाडी घेत आपले वर्चस्व दाखवून दिले होते. मात्र, अखेर अंतिम क्षणी कार्लसनचा अनुभव कामी आला आणि प्रज्ञानंद चॅम्पियनशिपला मुकला. स्पर्धा जरी कार्लसनने जिंकली, तरी मने मात्र प्रज्ञानंदने जिंकली, यात शंकाच नाही.
भालाफेकपटू नीरज चोप्रा याने 2023 जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत 88.17 मीटर लांब भाला फेकला आणि सुवर्णपदक आपल्या नावावर केले. ऑलिम्पिक स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकलेल्या नीरजने प्रतिष्ठेच्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतही सुवर्णपदकाला गवसणी घालत भारताचे नाव उंचावले आहे. साताऱ्याच्या पार्थ साळुंखे याने आर्यलँड येथे झालेल्या तिरंदाजीच्या युवा जागतिक स्पर्धेच्या रिकर्व्ह श्रेणीत सुवर्णपदक पटकावले, तर जर्मनीतील बर्लिन येथे झालेल्या तिरंदाजीच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आदिती स्वामीने विजेतेपद पटकावले.
गेल्याच महिन्यात युवा जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्यावर आदितीने वरिष्ठ गटात कम्पाऊंडच्या वैयक्तिक प्रकारातही ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवले. तिरंदाजीच्या एकाच जागतिक स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकाविण्याची भारताची ही पहिलीच वेळ असून, आदितीने पहिली आणि सर्वात तरुण वैयक्तिक सुवर्णपदक विजेती होण्याचा मान मिळवला आहे.
नीरजचे लक्ष्य…
नीरज चोप्रा आपल्या प्रयत्नांमध्ये 100 टक्के देण्याचा प्रयत्न करतो. भाला इच्छित ठिकाणी पोहोचणार याची त्याला खात्री असते. नीरजने आतापर्यंत जगभरातील जवळपास सर्वच प्रमुख स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले आहे. नीरजचा जन्म हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावातील. त्याचे शिक्षण चंदीगड येथील डीएव्ही कॉलेजमध्ये झाले. त्याच्या काकांनी त्याला पंचकुला येथील शिवाजी स्टेडियममध्ये नेले आणि भालाफेकीची ओळख करून दिली. नीरज चोप्राचे मूळ आडनाव चोपडे आहे. चोपडे हरियाणातील पानिपत येथील रोड मराठा समाजातून येतात. रोड मराठा हा तोच समाज आहे, जो पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाल्यानंतर देखील पानिपत सोनिपतकडच्या भागात वस्ती करून राहिला. नीरजला भारत सरकारतर्फे 2018मध्ये अर्जुन पुरस्कार देण्यात आला असून, 2021मध्ये त्याला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 2022मध्ये नीरजला पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. नीरजने जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत 88.17 मीटर भालाफेक केली असून, त्याच्या मते, थ्रो खेळाडूंसाठी कोणतीही फिनिश लाईन नसते. त्यामुळे येत्या काळात 90 मीटरहून अधिकचे लक्ष्य असणार आहे. सध्या दुखापतीमुळे अडचण येत असली तरी तो नक्कीच यश मिळवेल, याची भारतीयांना खात्री आहे.
12व्या वर्षी प्रज्ञानंद ग्रँडमास्टर
प्रज्ञानंदला वयाच्या तिसऱ्या वर्षापासून बुद्धिबळाची गोडी लागली. त्याचे वडील रमेशबाबू बँकेत नोकरी करतात. प्रज्ञानंद याची मोठी बहीण वैशाली ही बुद्धिबळ खेळते. तिच्याकडून प्रज्ञानंदने या खेळाचे प्राथमिक धडे गिरवले. आपला भाऊ बुद्धिबळात चमत्कार करेल, असे वैशालीला वाटले नव्हते. वयाच्या 12व्या वर्षी तो ग्रँडमास्टर झाला. देशातील सर्वात तरुण ग्रँडमास्टर होण्याचा बहुमान त्याच्या नावावर आहे. विश्वनाथन आनंद वयाच्या 18 व्या वर्षी ग्रँडमास्टर बनले होते. प्रज्ञानंद जगातील दुसरा सर्वात तरुण ग्रँडमास्टर ठरला. याबाबतीत युक्रेनचा सर्जी क्राजाकिन त्याच्या पुढे आहे. 1990 मध्ये वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी तो ग्रँडमास्टर बनला होता. प्रज्ञानंदपूर्वी विश्वनाथ आनंद याने 2000 आणि 2002 मध्ये या जागतिक स्पर्धेतील अंतिम फेरीत धडक मारली होती. दोन्हीवेळा त्यांनी फिडे वर्ल्डकपच्या किताबावर आपली मोहोर उमटवली होती. 2013 मध्ये वयाच्या आठव्या वर्षी प्रज्ञानंदने जागतिक युवा बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकली होती. प्रज्ञानंदने सातव्या वर्षी फिडे मास्टर पदवी मिळविली असून, दहाव्या वर्षी सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय मास्टर बुद्धिबळपटू बनण्याचा मान मिळविला आहे. त्याला त्याच्या आईची नेहमीच खंबीर साथ राहिली आहे.
युवा जागतिक विजेता पार्थ
तिरंदाजीच्या युवा जागतिक स्पर्धेत सोनेरी कामगिरी नोंदविणारा पार्थ साळुंखे ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. पार्थ फक्त एवढ्यावर थांबला नाही, तर दुहेरीमध्येही त्याने भारताला कांस्यपदक मिळवून दिले. पार्थ हा साताऱ्याजवळील करंजेपेठचा रहिवासी असून, त्यांचे वडील सुशांत साळुंखे हे त्याचे मार्गदर्शक आहेत. करंजेपेठ येथील श्रीपतराव पाटील हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर त्याच्या आई अंजली साळुंखे या याच विद्यालयात ग्रंथपाल म्हणून सेवा बजावत आहेत. पार्थ साळुंखे हा हरियाणामधील सोनिपत येथे प्रशिक्षण घेत असून, त्याचे तेथील प्रशिक्षक राम अवदेस यांच्या मार्गदर्शनात त्यांचा नियमित सराव असतो. पार्थच्या यशामध्ये शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव तुषार पाटील यांचाही मोलाचा वाटा आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज शिक्षण प्रसारक संस्थेची आर्चरी अकॅडमी सुरू आहे. संस्थेच्या कोणत्याही शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याला तेथे मोफत प्रशिक्षण मिळते. या अकॅडमीचा पार्थ साळुंखे हा आदर्श खेळाडू आहे, तर त्याचे वडील सुशांत साळुंखे हे तेथे मार्गदर्शक म्हणून काम करीत असतात.
आदितीने घेतला आव्हानांचा सुवर्णवेध
खडतर कष्ट आणि स्वत:वरील विश्वासाच्या जोरावर सरावासाठी उपलब्ध असलेल्या मर्यादित सुविधांचा आधार घेत वयाच्या 17 व्या वर्षी साताऱ्या जवळच्या शेरेवाडी या छोट्याशा गावातील आदिती स्वामीने तिरंदाजीत जागतिक सुवर्णपदकाला गवसणी घातली. आदितीचे वडील गोपीचंद स्वामी हे सरकारी शाळेत गणिताचे शिक्षक आहेत. त्यांना स्वत:ला खेळाची अत्यंत आवड. त्या आवडीतूनच आपल्या मुलीने एकातरी खेळात प्रावीण्य मिळवावे ही त्यांची इच्छा होती. आदिती 12 वर्षांची असताना गोपीचंद तिला सातारा शहरातील शाहू स्टेडियममध्ये घेऊन गेले आणि तिला विविध खेळांची ओळख करून दिली. तिथे काही मुले फुटबॉल खेळत होती, तर काही अॅथलेटिक्सचे प्रशिक्षण घेत होती. एका कोपऱ्यात काहीजण धनुष्य आणि बाणांची जुळवाजुळव करत लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न करत होती. अदितीचे लक्ष तिकडेच होते. तिला हा खेळ आवडल्याचे गोपीचंद यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. त्यांनी तिला तात्काळ तेथील प्रशिक्षण कार्यक्रमात दाखल केले. अदितीला क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्यांनी आपला मुक्काम गावातून सातारा शहरात हलवला. आदितीने प्रवीण सावंत यांच्याकडून तिरंदाजीचे धडे गिरविले. त्यांच्या अकादमीमध्ये आदिती आठवड्यातील पाच दिवस तीन तास, तर शनिवार-रविवारी पाच तासांपेक्षा जास्त सराव करायची. तिच्या वडिलांकडे धनुष्य-बाण घेण्यासाठी पैसेही नव्हते. लोकांकडून कर्ज घेऊन त्यांनी आदितीला स्वत:चे धनुष्य घेऊन दिले. आदितीच्या वडिलांनी सुरुवातीलाच माघार घेतली असती तर देश एका गुणवान खेळाडूला मुकला असता.
लेखक : नील वेदा