‘मास्टर स्ट्रोक’ या क्रीडा विषयाला वाहिलेल्या मराठी पाक्षिकाचा पहिला अंक आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. सुरू असलेली अनेक दैनिकं आणि नियतकालिकांना कठीण दिवस आले आहेत. हे जरी खरे असले तरी, एखाद्या विषयाला वाहिलेल्या किंवा सत्याच्या बाजूने कायम राहणाऱ्या छापील माध्यमाला वाचकांचा अजूनही चांगला पाठिंबा मिळतो आहे, हेही तेवढेच खरे आहे. याच पार्श्वभूमीवर आम्ही हा अंक सुरू करीत आहोत. या अंकात क्रीडा क्षेत्राविषयीच्या अद्ययावत माहितीबरोबरच प्रत्येक खेळातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, उदयोन्मुख खेळाडूंच्या आणि यशस्वी खेळाडूंच्या मुलाखती, देशभरातील प्रत्येक खेळासाठी असलेल्या तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आणि त्यासाठी करावयाच्या तयारीसंदर्भातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, खेळाडूंसाठी आहार, मानसिक आरोग्यासाठी करावयाची तयारी यासह होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्यापर्यंत ‘मास्टर स्ट्रोक’ आपली जबाबदारी चोखपणे पार पाडेल ही खात्री देतो.
‘ब्लेम गेम’ टाळायला हवा
प्रत्येक पालकांना आपल्या मुलाने अष्टपैलू असावे असे वाटत असते. आपल्या मुलाने अभ्यासात टॉपर आणि मैदानावर सचिन तेंडुलकर व्हावे, असे स्वप्न त्यांना पडत असते. मग सुरू होते त्या विद्यार्थ्याची फरफट. पहाटेपासूनच त्याला मग वेगवेगळ्या ‘टास्क’ पूर्ण करण्यासाठी जुंपले जाते. कधी अभ्यासाच्या क्लासेससाठी, तर कधी पालकांना ज्या खेळाची आवड असते त्या खेळाच्या क्लाससाठी. मुलाच्या आवडीचा विचारही त्यांच्या डोक्यात येत नाही. मग पहाटे सुरू होणारी त्या मुलाची फरफट आगदी रात्री उशिरापर्यंत सुरूच असते. अशा वेळी त्या मुलाला स्वतःचे बालपण जगण्यासाठी, त्याचा आनंद घेण्यासाठी वेळच उरत नाही. मग सुरू होते त्या मुलाचे स्वत्व गमावण्याची, त्याचा आत्मविश्वास डळमळीत होण्याची प्रक्रिया. मुलगा मग अभ्यासातही मागे पडतो आणि मैदानावरही आत्मविश्वास गमावून बसतो. हे ‘फ्रस्ट्रेशन’ मग मुलाला अॅरोगंट’ (बंडखोर) बनवत जाते. आणि सुरू होतो पालकांचा ‘ब्लेम गेम’. कधी पालकांमध्येच वादावादी सुरू होते, तर कधी शाळेला आणि खेळाच्या कोचेसना जबाबदार धरून त्यांनाच दोष दिला जातो. मात्र या सगळ्या मागचे कारण काय याचा कोणीही विचार करीत नाही. यासाठी योग्य ती पावले उचलण्याऐवजी कुणालातरी एकाला जबाबदार धरून ज्याचा मुलाच्या भविष्यासाठी काहीही उपयोग नाही, अशा टीका टिप्पणीला सुरुवात होते. यासंदर्भात बरेच बोलले जाते, लिहिले जाते. अनेक बिनकामी सल्लेही त्या मुलाचा पाठलाग करायला लागतात. त्यामुळे मुलाचा आत्मविश्वास वाढण्याऐवजी तो अधिकच ‘डिप्रेशन’मध्ये जातो आणि मग आपल्या मनाला वाटेल तसे वागायला सुरुवात करतो! ही झाली एक बाजू. दुसऱ्या बाजूला अनेक पालकांना शाळा, अभ्यास आणि करिअरमध्ये ‘स्पोर्टस्’ बाधा असल्याचे वाटत असते. त्यांना मुलांनी अभ्यास करून करिअर करावे, खेळामुळे कुठे करिअर होते, पोटा-पाण्याचे काय? असे प्रश्न पडत असतात. प्रत्यक्षात मैदानावर कोणत्याही खेळातील प्रगती ही त्या मुलाच्या भविष्याची पायाभरणीच असते हे आधी लक्षात घ्यायला हवे.
संघ भावनेचे महत्त्व
क्रीडा क्षेत्र हे असे विद्यापीठ आहे, ज्यात कोणत्याही मुलाला नेतृत्व करण्याची क्षमता, कष्ट करण्याची जिद्द, स्वतःचे कौशल्य वाढविण्यासाठी करावयाच्या मेहनतीचे महत्त्व, ‘टीम स्पिरिट’ (संघ भावनेचे महत्त्व), वरिष्ठ आणि प्रतिस्पर्ध्याबद्दल आदर, एवढेच नाही तर तणावावर नियंत्रण मिळविण्याची क्षमता (स्ट्रेस मॅनेजमेंट) वाढविण्याची ताकद, आणि जय-पराजयाला खुल्यादिलाने स्वीकारून खिलाडू वृत्ती प्रगल्भ करण्याची क्षमता क्रीडा क्षेत्रामध्ये नक्कीच आहे. या सगळ्यापेक्षाही सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मैदानावर घाम गाळणारा युवक शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या कायम सुदृढ राहिल्याने आयुष्यातील कोणत्याही लढाईला तो आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकतो. तसं बघायला गेलं, तर आपल्या समाजात अभ्यासात हुशार असलेल्या मुलांना एक वेगळा मान दिला जातो. त्यांचे वारेमाप कौतुक होते. या उलट एखाद्या खेळात पारंगत असलेल्या आणि त्याची आवड जोपासणाऱ्या मुलाकडे फारशा गांभीर्याने पाहिले जात नाही. उलट ‘पोटा-पाण्याचे काय?’ असा सवाल त्याच्यासमोर उपस्थित केला जातो. मग तुम्ही म्हणाल या पार्श्वभूमीवर नेमके काय करायला हवे? तर सगळ्यात पहिल्यांदा पालकांनी आणि क्रीडा क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या मुलांनी खेळ आणि अभ्यास यात समतोल (बॅलन्स)साधायला हवा. हे खरे आहे की, अभ्यासाने ज्ञान वाढते, पण खेळाकडे जास्त आकर्षित असलेल्या विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासाचेच ओझे घेऊन प्रगती करणे अवघड जाते. खेळाकडे जास्त लक्ष दिल्यामुळे अभ्यासातील प्रगतीला खीळ बसतो, मार्क कमी पडतात अशी उदाहरणे आहेत. मात्र, योग्य नियोजनाच्या आधारे हे टाळता येऊ शकते.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन
याच संदर्भात ‘मास्टर स्ट्रोक’मध्ये लिहिणारी तज्ज्ञमंडळी मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येक क्रीडा प्रकारातील प्रशिक्षक, तज्ज्ञ आणि अनुभवी खेळाडू नव्याने क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यास उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. अगदी त्या-त्या खेळातील प्रत्येक बारकाव्यासह ते खेळाडूंना दिशा दाखवतील. भारतात क्रिकेट इतका लोकप्रिय खेळ नाही; मात्र आता काही क्रीडा प्रकारांत अनेक गुणवान खेळाडूंनी आपले आणि आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केले असल्याने युवा पिढी या नव्या खेळांकडे गांभीर्याने बघायला लागली आहे; मात्र त्यासाठी कुठल्याही प्राथमिक सुविधा आणि मार्गदर्शन करणारी तज्ज्ञमंडळी सहज उपलब्ध होताना दिसत नाहीत. ज्या खेळाडूंनी ऑलिंपिक, राष्ट्रकुल, आशियायी स्पर्धांमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे, त्यांनी स्वबळावर आणि काही मोजक्या ‘स्पॉन्सरर्स’च्या पाठिंब्याने हे यश मिळविल्याचे स्पष्ट दिसते. एखाद्या खेळात प्रावीण्य मिळविण्याची क्षमता असलेले आणि गुणवान खेळाडू हुडकून त्यांच्या गुणांना पैलू पाडण्यासाठी आपल्याकडे ठोस अशी काही योजनाच नाही. खेळाडू, त्याचे पालक आणि कोच हे वैयक्तिक पातळीवर मेहनत घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारतात. त्यांच्या कष्टाला पारावार नसतो. मग शालेय स्तरापासून असे गुणवान खेळाडू निवडून गांभीर्याने त्यांना त्यांच्या क्रीडा प्रकारात उत्तम ट्रेनिंग देण्याची गरज नाही का? हे काम शाळेतच चांगल्या प्रकारे होऊ शकते, असे आमचे मत आहे. पण, शालेय स्तरावर क्रीडा धोरणच नसल्याने खरी अडचण होते. त्यामुळे शैक्षणिक धोरणातच क्रीडाविषयक धोरण सामावून घेतले जाणे गरजेचे आहे. केवळ क्रीडा क्षेत्रासाठी समर्पित राहणारा हा अंक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, असा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे शैक्षणिक प्रगतीबरोबरच क्रीडा क्षेत्रातील नैपुण्यही विद्यार्थ्याला साधता यावे, यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत.