मानसशास्त्राचे महत्त्व मागच्या लेखात आपण अभ्यासलं आहे. आता आपण त्याच्याच प्रक्रियेबाबत व त्याचा पायरी-पायरीने अभ्यास करणार आहोत आणि त्याच्या पुढे-पुढे कसे जाता येईल हे पाहूयात.
आपण आपल्या पाल्याला जेव्हा खेळाच्या मानसशास्त्रज्ञाकडे नेतो, तेंव्हा ते मूल दुसऱ्या दिवसापासून त्या खेळात नैपुण्य मिळवेलच असे नाही. मराठीत एक म्हण आहे, ‘पी हळद आणि हो गोरी’ पण असे कधीच होत नसते. आपण आपल्या मुलाला आजारी असताना डॉक्टरकडे घेऊन जातो. त्याने दिलेल्या औषधाने मूल थोड्याच दिवसात बरे होते. पण त्याला तो आजार पुन्हा पुन्हा होऊ नये, त्यासाठी मात्र आपण त्याच्या खाण्या-पिण्याच्या सवयी व्यवस्थित करतो; आणि त्याची आपल्या मुलाला सवय होते. त्यामुळे त्याची प्रतिकारशक्ती वाढते. त्याला त्याच्या आहाराविषयी शिस्त आणि त्याचे वारंवार आजारी पडणे बंद होते. तसेच शाळेत गेल्यावर आपलं मूल पहिल्याच दिवशी १० वी पास होत नाही, तर बालवाडी ते १० वी असा मोठा प्रवास ते बाळ करत असते. अभ्यासाचा खूप (प्रॅक्टीस) सराव ते सातत्याने करत असते. किंबहुना रोज शाळेत जाऊन तो अभ्यासाचाच सराव करतो, आणि एक दिवस उत्तम मार्क्स मिळवून १० वी पास होतो.
तसंच मानसशास्त्राचं पण आहे. मुलाला मानसिक आजार आहे म्हणून त्याला मानसशास्त्राकडे न्यायचे नसते, तर मानसिकदृष्ट्या तो बलवान व्हावा, सक्षम व्हावा आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागावा म्हणून त्याला सुरुवातीलाच मानसशास्त्राची ओळख करून द्यावी. आपण खेळाडूंना खेळाचे सर्व ज्ञान देत असतो, चांगला आहार देत असतो, तसेच ते रोज विशिष्ट खेळाचा सराव करत असतात. सरावामुळे त्यांचे क्रीडा नैपुण्य वाढत असते. आहार आणि तंदुरुस्तीसुद्धा सुरेख साथ देत असते. पण मनाचे काय? त्यांच्या मनात जर प्रतिस्पर्ध्याची भीती वाटत असेल. त्याना अटीतटीच्या सामन्यात योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायची तयारी नसेल, तर अत्यंत कुशल खेळाडूसुध्दा अपयशी होऊ शकतो. ते अपयश पचवून पुढे जाण्यासाठी त्याच्या मनाचा निर्धार खूप काम करतो. प्रत्येक वेळी आपल्याला यशच प्राप्त होइल अशी स्वतःकडून अपेक्षा करणे चुकीचे आहे. आपण आपलं सर्व सामर्थ्य पणाला लावून, (म्हणजे तंत्र, ताकद आणि हुशारी) जर वापरली तर आपला विजय जवळच आहे. याची खात्री प्रत्येक खेळाडूला वाटणं आवश्यक असते; आणि इथेच मानसशास्त्र सर्वांत जास्त चांगलं काम करू लागतं.
मानसशास्त्रज्ञ खेळाडूंकडून सर्व माहीती घेत असतो आणि त्यावरून त्याची मानसिकता. त्याची मानसिक ताकद, त्याची मानसिक कमजोरी याचा अभ्यास करून त्यावर काम करून ती कमजोरी त्यांची ताकद कशी बनेल, तसेच त्याच्याकडे असणारे गुण त्याची त्या खेळातील सर्वात ताकदवान गोष्टींची त्याला जाणीव करून देते. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढत जातो. आणि निर्णय घेण्याची क्षमतापण उंचावयास सुरुवात होते. त्याला त्याच्या स्वत:विषयी पूर्ण खरी माहिती होते. त्याच्या आजूबाजूच्या परिसराचा, परिवाराचा विचार त्याला त्रास देत नाही. तो त्याच्या ध्येयाकडे वाटचाल करण्यास सर्व ताकदीनिशी तयार होतो. हे सर्व करताना सराव आणि संयम या दोन गोष्टींची नितांत आवश्यकता असते.
तीन बाबींचा विचार महत्त्वाचा
पहिली पायरी म्हणजे ज्या खेळाडूंनी आपले ध्येय ठरवलेले आहे ते साध्य करण्यासाठी त्याला त्याच्या खेळाच्या आजूबाजूच्या वातावरणाचा त्याच्या खेळाच्या ताकदीचा आणि त्याला आतापर्यंत प्राप्त झालेल्या तांत्रिक बाबींची जागरूकता (awareness) असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे त्याच्या पालकांना आणि प्रशिक्षकांना याची जाणीव असायला हवी. म्हणजेच हा खेळाडू सरावादरम्यान काय विचार करतो त्याचे आणि त्याच्या प्रशिक्षकामधील नाते आणि सामंजस्य कसे आहे त्याचा विचार केला पाहिजे. पालकांची आर्थिक स्थिती, घरातील खेळाविषयीचे वातावरण प्रोत्साहनकारक आहे का? हा पण विचार होणे गरजेचे आहे. तसेच प्रत्यक्ष सामन्याच्यावेळी त्याला काय विचार येतात, ही सर्व माहिती जर मानसशास्त्रज्ञाला समजली की त्याला त्याच्या विचारांची साखळी समजायला सुरुवात होते.
मग त्यांना त्यांचे विचार (positive) सकारात्मक की, नकारात्मक (negative) आहेत याची कल्पना येते. आणि त्यांचा अभ्यास सुरू होतो. मग ते त्या खेळाडूची विचार साखळी सकारात्मक करण्यास सुरुवात करतात. उदा. एखादा खेळाडू सराव करताना त्याच्या मनात भेदभावाची भावना निर्माण होणे हे फारच नकारात्मक आहे. म्हणजे माझे सर, माझ्याकडे जास्त लक्ष देत नाहीत; माझ्या प्रतिस्पर्ध्याकडून ते जास्त सराव करून घेतात. अशा पद्धतीचे विचार त्याचे लक्ष विचलित करू शकतात. पण त्याउलट जर एखाद्याने असा विचार केला की, सर सर्वांनाच चांगल शिकवतात, मझ्याकड जास्त लक्ष देत नाहीत म्हणजेच कदाचित मी चांगलाच खेळत असेन; आणि मी जे जे शिकलो आहे ते जर मी शंभर टक्के देऊ शकलो तर मी यशाच्या खूप जवळ. जाऊ शकतो यालाच आपण सकारात्मक विचार असे म्हणतो.
दबावमुक्त मानसिकता निर्माण करणे गरजेचे
एखाद्याला सामन्याच्या आधी जर भीती वाटू लागली तर, हे अगदी स्वाभाविक आहे, तेव्हा त्याचे विचार व विचारांची धारणा फार चांगले काम करू शकते. ती कशी? घाबरल्यावर त्याने जर सा विचार केला की, मला जेवढ येतं ते जर १००% देण्याचा प्रयत्न मी केला तर मला घाबरायचं काहीच कारण नाही. मी फक्त चांगला उत्तम खेळ केला आणि त्या खेळातून मी आनंद घेऊन जर समाधान मिळाले तरी मी यश मिळवेनच. सामन्यामध्ये विजय किंवा पराभव हे माझासाठी दुय्यम आहे. माझा खेळ चांगला व्हावा हे महत्त्वाचं आहे. मग भीती अचानक गायब झाल्याची अनुभूती खेळाडूला मिळेल.
म्हणजे जिंकणे किंवा हरणे, किंवा निकालाचा कोणताही दबाव त्याच्यावर राहाणार नाही. आणि दबावमुक्त मानसिकतेमध्ये त्याचा खेळ सर्वोत्तम होईल.
तिसरा आणि शेवटचा मुद्दा; सामना खेळताना स्वतःची बलवान क्षमता कशात आहे हे जर खेळाडूने समजून खेळ केला, तर त्याला यश निश्चित यश मिळू शकत. सामना चालू असताना मला कोणते विचार त्रास देतात, कोणते विचार माझ्या मनावर दबाव अणतात, हे जर त्या खेळाडूने त्याच्या मानसशास्त्रज्ञाला सांगितले, तर निश्चितच त्याचा फायदा खेळाडूला सामन्याच्या वेळेस झाल्याशिवाय राहाणार नाही. कारण मानसशास्त्रज्ञ त्याच्या विचारांच्या साखळीचा अभास करून त्याचे नकारात्मक विचार बदलून ते सकारात्मक करण्याच्या दृष्टीने काम करतात. आणि त्याचमुळे खेळाडू निश्चितच यशाच्या खूपच जवळ पोहचत असतो.
लेखिका : डॉ. गायत्री वर्तक
लेखिका मानसोपचार तज्ज्ञ व क्रीडा सायकॉलॉजी शास्त्रज्ञ आहेत.