जीवनं तर्पणं हृद्यं ल्हादि बुद्धि प्रबोधनम्
तन्वव्यक्तरसं मृष्टं शीतं लघ्वमृतोपमम् (वा.सं)
अर्थात, पाणी हे आल्हादकारक, तृप्तिदायक, मनातील चेतना जागविणारे, जीवन व्यवहाराला उत्तेजना देणारे, पिण्याला प्रिय व अमृततुल्य असते, अशा शब्दांत आयुर्वेदात पाण्याचे महत्त्व विशद करण्यात आले आहे. प्रस्तुत लेखात आपण पाणी आणि द्रव पदार्थ (Fluids & Minerals) खेळाडूंच्या आयुष्यातील महत्त्व जाणून घेणार आहोत.
पृथ्वीवरील एकूण क्षेत्रफळाच्या ७१ टक्के भागात पाणी आहे, तर मानवी शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण ६० टक्के आहे. खेळाडूंच्या रोजच्या जीवनामध्ये आहारासोबत लिक्विड्सचा खूप जवळचा संबंध आहे. रोजच्या सरावाच्या वेळेला आणि ज्या वेळेस त्यांच्या मॅचेस असतात त्या दरम्यान त्यांना फ्लूईड्स मेंटेन ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कोणताही खेळ खेळताना किंवा व्यायाम करताना शरीराचे तापमान वाढते, उष्णता निर्माण होत असते. ही अतिरिक्त उष्णता घाम आणि लघवीच्या माध्यमातून शरीराच्या बाहेर फेकली जाते. त्यामुळे खेळाडूंनी शरीरात कायम पाण्याचे (Fluids & Minerals) प्रमाण संतुलित ठेवणे आवश्यक आहे. खेळाडूंनी आपल्या खेळाचा प्रकार, हवामान यानुसार पाण्याचे (liquids) प्रमाण ठरवणे गरजेचे आहे.
पाण्याचे (Fluids) प्रमाण किती असावे?
माणसाने दररोज किती पाणी प्यावे, याचे काही सरासरी अंदाज मेडिकल सेक्टरमध्ये मांडण्यात आलेले आहेत. मात्र, सरसकट विचार करण्यापेक्षा खेळाडू म्हणून आपण अगदी बारकाईने विचार करणे आवश्यक आहे. आपला खेळाचा प्रकार कोणता आहे, आपलं वय किती आहे, आपण मेल आहोत की फिमेल आहोत अशा, अनेक विषयांवर पाण्याचं प्रमाण अवलंबून असतं. शिवाय ऋतूमानानुसारही पाण्याच्या प्रमाणात कमी अधिक बदल होत असतात. महिला खेळाडूंच्या बाबतीत मासिक पाळी (Menstrual Cycle) च्या दरम्यान पाणी सेवन (fluids intake) करण्याच्या सेवनात बदल करणे फायद्याचे ठरते.
पाण्याची गरज भागविण्यासाठी काय घ्यावे?
सामान्य माणसांपेक्षा खेळाडूंचं पाण्याचं प्रमाण हे जास्तच असतं, अशा वेळेला नुसतं पाणी पिण्यापेक्षा इतर गोष्टींचा आधार घ्यायला हवा. उदा. महाराष्ट्रामध्ये पाण्याची गरज भागविणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये खूप वैविध्य दिसून येते. कुठे पेजेचा वापर केला जातो; तर कुठे आंबील, कुठे सोलकढी, तर कुठे ताकाचा भरपूर वापर केला जातो. आपल्या आजूबाजूला मिळणाऱ्या व लहानपणापासून त्याच्याशी नाळ जुळलेल्या विविध द्रव पदार्थांचा (Liquids / Fluids) समावेश तुमचे पोषण तर करतीलच, आणि या माध्यमातून तुम्ही तुमच्या खेळाचा दर्जा सुधारण्यास मदतीचे ठरतील. (Vocal for local)
काय घेऊ नये ?
बदलत्या जीवनशैलीमुळे चविष्ट आणि पाण्याची गरज भागवतील असे वाटणारी अनेक पेयं आपल्या आजूबाजूला उपलब्ध आहेत. त्यामध्ये रेडिमेड ज्युसेस, मिल्कशेक, कोल्ड कॉफी, नवनवीन प्रिझर्वेटिव्ह आणि एक्स्ट्रा शुगर असलेले बेव्हरेजेसा यांचा समावेश होतो. हल्ली Ready -To Drink आणि पौष्टिकता नसलेल्या कोल्ड्रिंक्सचे प्रमाणही (Energy Drinks) खूप वाढलेले आहे. हे जरी ‘टेस्टी मॉडर्न ड्रिंक्स’ वाटत असले तरीही त्याचे अनेक दुष्परिणाम दिसतात. त्याच्यातल्या साखरेमुळे थोड्याफार प्रमाणात कॅलरीज मिळत असल्या तरीही, त्यात कॅफेनचे प्रमाण जास्त असते. याचा नित्य केलेला वापर तुमच्यात Insulin resistance डेव्हलप करेल आणि त्यातून वेगवेगळ्या तक्रारींची सुरुवात तुम्हाला होताना दिसेल.
पुढील तक्त्याच्या आधारे साधारण कोणत्या द्रव पदार्थांचा (Liquids / Fluids) नित्य उपयोग करायला हवा, कोणते पदार्थ गरजेनुसार आणि थोड्या प्रमाणात घेणे गरजेचे आहे आणि कोणते पदार्थ टाळलेले बरे हे मांडले आहे.
हे घ्या
शहाळे, आवळा सरबत, लिंबू सरबत, कोकम सरबत, नीरा, पन्हे, दूध, ताक, भाज्यांचे सूप किंवा नाॅन व्हेज सूप (जे घरी बनवलेले असतील), कुळथाचं / मुगाचं कढण, उन्हाळ्यात आंबील, तर हिवाळ्यात कढण / सूप, स्मूदीज (भाज्यांपासून बनवलेले), फळे चाऊन खाणे (यातून पण पाण्याचा शरीराला फायदा होतो) यामध्ये शक्यतो प्रिझर्वेटिव्ह नसलेल्या गोष्टींचा वापर आवश्यक.
हे टाळा
कोल्ड ड्रिंक्स, कोल्ड कॉफी, एनर्जी ड्रिंक्स, ज्यूस, कृत्रिम घटक असलेले कोणतेही द्रव पदार्थ, बीअर, वाईन, रम, व्हिस्की, इ. मादक पेये… कॅफेन हे एक औषध असले तरी त्याचे सेवन डॉक्टरांच्या देखरेखीखाली करायला हवे.
पाणी कसे प्यावे?
* एकदम थंड किंवा एकदम गरम पाणी कधीही पिऊ नये. त्यामुळे तुमच्या पचनशक्तीवर परिणाम होण्याचा धोका असतो.
* पाणी हळूहळू प्यावे.
* पाणी साठवण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर कमीत कमी करून मातीची भांडी किंवा तांबे किंवा किमान स्टीलचा वापर करावा.
शरीरात पाणी कमी झाले तर खेळाडूंवर होणारा परिणाम :
पाणी कमी झाल्याने शरीराला थकवा जाणवू लागतो. पाणी अधिक प्रमाणात कमी झाले तर डिहायड्रेशन होते.
तोंड आणि त्वचा कोरडी (Dry Skin) पडणे, बद्धकोष्ठता (Constipation), सांधेदुखी (Joint pain), केस गळणे (Hairfall, Hair thinning) असे अनेक दुष्परिणाम दिसून येतात. खेळाडूंनी ऋतुमान (season) आणि खेळाचा प्रकार लक्षात घेऊन कोचच्या मार्गदर्शनानुसार पाण्याचे संतुलन ठेवायला हवे. नाही तर गंभीर समस्या उद्भवू शकतात.
समजा, उन्हाळ्यामध्ये तुम्ही मैदानावर मॅच खेळत आहात किंवा सराव करत आहात अशा वेळी जर पाण्याचे प्रमाण कमी झाले आणि त्याकडे दुर्लक्ष करत तुम्ही खेळत राहिलात, तर बेशुद्ध पडण्याचा धोका असतो. मसल्समध्ये लिक्विड कमी असेल किंवा मीठ आणि साखर यांचं प्रमाण कमी असेल तर तुम्ही अपेक्षित परफॉर्म करू शकत नाहीत.
ह्युमिड वातावरणामध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित आणि संतुलित कसे राहील, याकडे तुमचे कोचेस लक्ष देत असतात. पालकांनीही तुमचं मूल दैनंदिन आहारात किती प्रमाणात पाण्याची गरज भागविणारे योग्य पदार्थ घेतोय का, हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच क्रीडा प्रशिक्षकांनीही (कोच) लक्ष देणे आवश्यक आहे.
मित्र-मैत्रिणींनो, तुमचा खेळ सुधारण्यामध्ये द्रव पदार्थांचा (Liquids / Fluids) खूप महत्त्वाचा वाटा आहे. त्याकडे बारकाईने बघायला शिका, समजून घ्या, प्रश्न असतील तर तज्ज्ञांना विचारा आणि त्यानुसार दैनंदिन जीवनात त्याचा अंतर्भाव करा.
लेखिका : डॉ. आरती व्यास
लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ व आहार तज्ज्ञ