भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेमध्ये वेस्टइंडिज संघाची जी कामगिरी होती ती बघता त्यांचा संघ कसोटी इतिहासातल्या त्यांच्या संघांमध्ये सर्वात खराब संघ असेल. म्हणजे या मतावर येण्यासाठी ते मालिका हरले हे एकच कारण नक्कीच नाही. एखादा चांगला संघदेखील एखादी मॅच हारतोच की केव्हातरी. परंतु ते ज्या पद्धतीने खेळले, तसेच त्यांच्या खेळाडूंचा सुमार दर्जा, लॅक ऑफ टॅलेंट, फिटनेसबाबत उदासीनता यामुळे हा संघ आपली जुनी प्रतिष्ठा हरवून बसला आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
एकेकाळी जो संघ जगामधला सर्वोत्तम कसोटी संघ म्हणून ओळखला जायचा, त्या संघाची आता अशी दयनीय अवस्था का झाली ही खरोखर विचार करायला लावणारी बाब आहे. १९८०च्या दशकात वेस्टइंडिज संघामध्ये एकापेक्षा एक दिग्गज असे खेळाडू उदयास आले. क्लाईव्ह लॅाईड याच्याबरोबरच अल्विन कालिचरण, व्हीव्हियन रिचर्ड्स, गॅार्डन ग्रीनिज, डेसमंड हेन्स, रॉय फ्रेड्रिक्स यासारखे एकापेक्षा एक अप्रतिम फलंदाज या संघात होते. त्याचप्रमाणे अँडी रॉबर्ट्स, माल्कम् मार्शल, वॅनबर्न होल्डर, मायकेल होल्डिंग, जोएल् गार्नर तसेच त्यांच्या पाठोपाठ संघात आलेले केलेले कोर्टनी वॉल्श, कर्टली एम्ब्रोस यासारखे एकापेक्षा एक भयावह गोलंदाजांची फौज या संघात होती. हे सर्व खेळाडू इतके प्रतिभावान होते की, त्यांच्यामध्ये एकट्याच्या ताकदीवर संघाला जिंकून देण्याची क्षमता होती.
सोपी रणनीती
आपल्या चार-पाच जलद गती गोलंदाजांच्या बॅटरीसमोर समोरच्या संघातील फलंदाजांवर दडपण आणणे आणि त्यांना गारद करणे आणि आक्रमक फलंदाजी करून समोरच्या संघातल्या गोलंदाजांना डॅामिनेट करून धावांचा डोंगर रचणे व समोरच्या टीमचा पराभव करणे इतकी साधी रणनीती त्यांची असायची. समोरचे संघ यामुळे त्यांच्याविरुद्ध कायमच दडपणाखाली खेळत असे. त्याकाळी थायपॅड, चेस्टपॅड तसेच हेल्मेट अशी प्रोटेक्टिव गॅजेट्स अस्तित्वात नव्हती त्याचा फायदा वेस्टइंडिज गोलंदाजांना झाला. त्यांची स्विंग गोलंदाजी तर भेदक होतीच; परंतु वेगवान आणि आखूड टप्प्याची गोलंदाजी करून फलंदाजाला घाबरवून सोडण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. हे त्यांचे वर्चस्व २००१ सालापर्यंत टिकून होते. त्यानंतर त्यांचे हे सर्व प्रतिभावान खेळाडू एक-एक करून निवृत्त होत गेले आणि संघाची ताकद कमी होत गेली.
प्रतिभावान खेळाडूंची आवक थांबली
ब्रायन लारासारखा एखादाच जागतिक दर्जाचा खेळाडू सोडला, तर त्यांच्या संघाला पूर्वीइतके प्रतिभावान खेळाडू मिळाले नाहीत. कार्ल हुपर, इयन बिशप, शिवनारायण चंडरपॅाल, रीची रिचर्डसन यासारखे काही दर्जेदार खेळाडू संघात आले; परंतु आधीच्या खेळाडूंच्या तुलनेत ते कमीच होते. परिणामी त्यांचा संघ कमकुवत होत गेला.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड तसेच आशिया खंडातील तीन संघ म्हणजेच भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका यांचे संघ मजबूत होत गेले. खेळाचे नियमही बदलत गेले, एका षटकात किती आखूड टप्प्याचे चेंडू टाकू शकतो यावर नियंत्रण आले. तसेच खेळपट्ट्या बदलत गेल्या. खेळाडू चांगले प्रोटेक्टिव्ह गिअर वापरू लागले त्यामुळे वेस्टइंडिज संघातील जलद गती गोलंदाजांचा प्रभाव कमी होत गेला. जास्तीत जास्त प्रेक्षक कसोटी क्रिकेटकडे आकर्षित व्हावेत, या उद्देशाने भरपूर रन्स होतील अशा बॅटमन ना अनुकूल खेळपट्ट्या बनू लागल्या. फिरकी गोलंदाजांना अनुकूल अशा खेळपट्ट्या खास करून आशिया खंडात बनवल्या जाऊ लागल्या आणि त्याचा फायदा अतिशय चांगल्या दर्जाच्या फिरकी गोलंदाजांनी घेतला. परंतु वेस्टइंडिज संघाने स्वतःला या बदलाप्रमाणे बदलून घेतले नाही आणि ते त्यांच्या जुन्या पद्धतीने खेळत राहिले. बाकीचे संघ जलदगती गोलंदाजीमध्ये नवीन नवीन ट्रिक्स वापरू लागले चेंडू स्विंग करणे, कट करणे, यॅार्कर तसेच रिव्हर्स स्विंग यासारख्या नवीन पद्धतींचा इतर संघ अवलंब करू लागले; परंतु वेस्टइंडिजचे गोलंदाज आपल्या जुन्या पद्धतीप्रमाणे फक्त वेगवान गोलंदाजी करण्यावर भर देत राहिले. त्यांच्याकडे अपवाद वगळता चांगले फिरकी गोलंदाज तयार झाले नाहीत, तर फिरकी गोलंदाजांचा सामना करण्याचे तंत्रही त्यांच्या फलंदाजांनी शिकून घेतले नाही.
दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या नवीन जनरेशनने कसोटी क्रिकेटकडे दुर्लक्ष केले आणि त्यांना वन डे आणि टी ट्वेंटी क्रिकेट जास्त आकर्षित करू लागले. संघाचा दर्जा खालवल्यामुळे तिथला प्रेक्षकवर्ग कसोटी सामन्यांपासून दूर गेला आणि संघाची पॉप्युलॅरिटी कमी होत गेली. नवीन पिढी क्रिकेट सोडून फुटबॉल, बास्केटबॉल, बेसबॉल यासारख्या इतर खेळांकडे आकर्षित झाली. क्रिस गेल, केविन पोलार्ड, सुनील नारायण यासारखे प्रतिभावान खेळाडू देशाकडून खेळण्याऐवजी आयपीएलसारख्या स्पर्धेकडे जास्त आकर्षित झाले. या सर्वांचा परिणाम म्हणजे आजच्या घडीला वेस्टइंडिजचा असलेला दुय्यम संघ आणि त्यांची सुमार कामगिरी.
कसोटी क्रिकेटवर प्रेम करणारा असा आजही एक रसिकवर्ग जगभरात आहे, त्यांना कुठेतरी पूर्वीचा वेस्टइंडिजचा प्रतिभावान संघ परत तयार व्हावा आणि आणि जागतिक कसोटी क्रिकेटला एक नवीन संजीवनी मिळावी, असे नक्कीच वाटत असणार. यासाठी वेस्टइंडिजमध्ये सर्व स्तरावर खूप मोठे काम होण्याची गरज आहे. देशाचे नागरिक, तिथले क्रीडाप्रेमी प्रेक्षक, क्रीडा संस्था, खेळाडू आणि क्रिकेट बोर्ड यांनी एकत्र येऊन खूप मेहनत करण्याची गरज आहे. वेस्टइंडिज संघाला पूर्वीचे दिवस परत यावेत आणि त्यांच्याकडे पूर्वीसारखे एकापेक्षा एक प्रतिभावान खेळाडू तयार व्हावेत, अशी फक्त आशा आपण करू शकतो.
लेखक : भालचंद्र जोगळेकर
लेखक माजी रणजीपटू आणि प्रशिक्षक आहेत.