ब्रिजटाऊन : भारतीय संघाला विश्वविजेतेपद मिळवून दिल्यानंतर रोहित शर्माने टी-२० प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे आता भारतीय संघाचा नवा कर्णधार कोण, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र नवा कर्णधार कोण असणार, हे ठरवण्याचा निर्णय पूर्णपणे राष्ट्रीय निवड समितीच्या हाती असेल. यामध्ये बीसीसीआय हस्तक्षेप करणार नाही, असे मत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी नोंदवले.
रोहित, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी-२० प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र ते एकदिवसीय व कसोटी प्रकारांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत राहतील. दरम्यान, भारतीय संघ लवकरच झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार असून यासाठी शुभमन गिलकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. मात्र २०२६च्या टी-२० विश्वचषकाची तयारी करण्याकरता आताच कायमस्वरूपी नवा कर्णधार नेमणे गरजेचे आहे. त्यामुळे अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती लवकरच याविषयी निर्णय घेईल, असे समजते.
“वरिष्ठ खेळाडू भारताच्या एकदिवसीय व कसोटी संघाचा नक्कीच भाग असतील. पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी तसेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आहे. त्यामुळे त्यांचा अनुभव संघासाठी मोलाचा असेल. मात्र टी-२० प्रकारात आता नव्या दमाचा भारतीय संघ पहावयास मिळेल. त्यामुळे यासाठी काही काळ लागेल. नवा कर्णधार कोण असेल, यासंबंधीचा निर्णय घेण्यासाठी निवड समिती सक्षम असेल,” असे शहा म्हणाले. टी-२० विश्वचषकात हार्दिक पंड्या उपकर्णधार होता. तसेच हार्दिकच्या अनुपस्थितीत के. एल. राहुल व सूर्यकुमार यादव यांनीही गेल्या वर्षभरात भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्व केले. त्यामुळे आता नक्की कोणत्या खेळाडूवर निवड समिती विश्वास दर्शवणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
नवा प्रशिक्षक श्रीलंका दौऱ्यापासून कार्यरत
टी-२० विश्वचषकाच्या जेतेपदासह राहुल द्रविड यांचा भारताच्या मुख्य प्रशिक्षणपदाचा कार्यकाळही संपुष्टात आला आहे. त्यामुळे आता नवा प्रशिक्षक कोण, याविषयीही चाहत्यांना उत्सुकता लागून आहे. ६ जुलैपासून रंगणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणला हंगामी प्रशिक्षक म्हणून भारतीय संघासोबत पाठवण्यात येणार आहे. मात्र जुलै महिन्याच्या अखेरीस भारताचा संघ श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे. त्या दौऱ्यापासून नवा प्रशिक्षक कार्यभार सांभाळेल, असे शहा यांनी सांगितले. गौतम गंभीरचे नाव मुख्य प्रशिक्षकपदासाठी पक्के झाल्याचे समजते. २७ जुलैपासून भारत-श्रीलंका यांच्यात प्रत्येकी ३ टी-२० व एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येईल.