आज प्रॅक्टिस…. उद्या रेस्ट!

file picture

जुडो-कराटे हा शब्द जनमानसात खरा प्रचलित झाला तो म्हणजे ब्रूसलीच्या ‘एन्टर दी ड्रगन’ या चित्रपटानंतर.. अगदी जगभरात. बॉलीवूड लगेचच आशा चित्रपटांचे गल्ला भरण्यासाठी तत्पर अनुकरण करतो; पण काहीही असो या चित्रपटांमुळे गल्लोगल्ली पांढऱ्या ढगळ कपड्यांतील विद्यार्थी रस्त्यावरील खांबांपासून ते भिंतीपर्यंत सर्वांवर ठोसेबाजीचा सराव करताना दिसू लागले. यामुळे अनेकजण कराटेच्या वर्गांवर जसे दाखल झाले, तसे ते त्या-त्या ठिकाणी उपलब्ध ज्यूदोच्या वर्गात प्रवेश घेते झाले.

यात कराटे या कलेकडे अधिकतर इच्छुक शिकायला जाऊ शकले, कारण या स्वसंरक्षण ‘कलेला’ साधन सामुग्रीची ज्यूदोच्या तुलनेने नगण्य आवश्यकता असते. पण ज्यूदोसाठी मात्र हा इनडोर ‘खेळ’ असल्याने बंदिस्त जागा, मॅट, विशिष्ट जाड कापडाचा गणवेश आदी खर्चिक बाबी अंतर्भूत आहेत.
ज्यूदो ही जशी स्वसंरक्षण कला आहे तसा तो खेळही आहे. अर्थात हा खेळ असल्याने आणि तो अधिकृत खेळ असल्याने त्याला शासनाच्या सर्वच्या सर्व सवलती आणि फायदे लागू आहेत. म्हणजेच या सवलती, फायदे ज्यूदो खेळाडूला आणि ज्यूदो संघटनेला मिळू शकतात. या फायदे आणि सवलती व त्यांचा ऊहापोह आपण नंतरच्या लेखांमध्ये करूया. तर 1980च्या दशकात या खेळाचे नाव ब्रूसलीमुळे जसे जगभर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले, तसेच ते आपल्या राज्यातही सर्वतोमुखी झाले. परंतु ज्यूदो खेळ महाराष्ट्रात राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये साधारणपणे 1973 पासून आयोजित होऊ लागला होता, ही मात्र वस्तुस्थिती आहे.

मराठी माणसाने भारतात रुजवला ज्यूदो

भारतामध्ये ज्यूदो या खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्यास कारणीभूत आहे तो म्हणजे ‘मराठी माणूस.’ आहे की नाही इंटरेस्टिंग. त्यासाठी आपण थोडा इतिहास पाहूया. भारतामध्ये सर्वप्रथम ज्यूदोचा प्रारंभ झाला तो स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये वर्ष 1929च्या सुमारास. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या आमंत्रणावरून जपानी सेन्से (सेन्से म्हणजे शिक्षक) श्री. ताकागाकी शांतिनिकेतन येथे आले आणि त्यांनी ज्यूदोची प्रात्यक्षिके सादर केली. परंतु, त्यानंतर ज्यूदो प्रशिक्षणातील सातत्याच्या अभावामुळे प्रसार तिथेच थांबला. परंतु, या प्रात्यक्षिकांमुळे ज्यूदोच्या भारतामधील प्रवेशाची इतिहासामध्ये नोंद झाली. त्यानंतर जागतिक स्तरावर ज्यूदोचे माहेरघर असणाऱ्या ‘कोदोकान’ विद्यापीठातील आपणास समजलेल्या नोंदीप्रमाणे १०३२ साली अमरावतीच्या श्री. ज्ञानेश्वर देशपांडे यांना शो दान ब्लॅक बेल्ट (प्रथम श्रेणीचा, पहिला, ब्लॅक बेल्ट) प्रदान केला गेला; मात्र भारतीय ज्यूदोचा सर्वार्थाने प्रचार – प्रसार झाला तो वर्ष १९४० नंतरच्या काळामध्ये; याचे मुख्य स्त्रोत होते ‘महाराष्ट्र आणि मराठी माणूस.’

See also  गिल, सुंदर आणि ऋतुराजने गाजवला तिसरा सामना; मालिकेत आघाडी!

जागतिक ज्यूदोचे उद्गाते सेन्से (म्हणजे सर, गुरू, शिक्षक) डॉ. जिगोरो कानो आणि सेन्से प्रोफेसर मिफुने यांच्याकडून खाणीवाले सेन्से (ब्लॅक बेल्ट ७ दान) यांनी जपानमध्ये जाऊन ज्यूदोचे धडे गिरवले. साधारणपणे १९३० चा तो काळ होता आणि लाठी-काठी आणि कुस्ती याचे ज्ञान असणाऱ्या तसेच उत्तम तिरंदाज असणाऱ्या श्री. खाणीवाले सेन्से यांना अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ या संस्थेमधून जपान येथे तिरंदाजीचे प्रशिक्षण देण्यासाठी पाठवले होते. यासाठी त्यांना इचलकरंजी येथील महाराजांकडून शिष्यवृत्ती मिळाली होती. या आधी श्री ज्ञानेश्वर देशपांडे यांना जपानमध्ये तिरंदाजीचे प्रशिक्षण देण्यासाठी या शिष्यवृत्तीच्या आधारे पाठवण्यात आले होते; पण ते कार्य काही कारणामुळे अपूर्ण राहिले. त्यानंतर श्री. खाणीवाले सेन्से यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी होकार दिला आणि खाणीवाले सेन्सेना जपान येथे पाठवण्यात आले. जपानमधील चार वर्षांच्या काळामध्ये श्री. खाणीवाले सेन्से यांनी तिरंदाजीचे तंत्र शिकवत असतानाच ज्यूदोचे प्रशिक्षण प्राप्त केले. भारतामध्ये परतल्यानंतर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे इचलकरंजीच्या महाराजांच्या इच्छेनुसार तेथील पहिलवानांना शिकवण्यासाठी काही काळ ज्यूदोचे वर्ग सुरू केले आणि नंतर ते इचलकरंजी येथून पुण्याला आले व पुण्यात स्थायिक होऊन सन १९४० च्या सुमारास त्यांनी ज्यूदो प्रसारास प्रारंभ केला.

महाराष्ट्रात ज्यूदो रुजले

१९३५ दरम्यान श्री. खाणीवाले सेन्से बर्लिन (जर्मनी) येथे झालेल्या ऑलिंपिक्समध्ये भारतीय चमूचे व्यवस्थापक होते. त्यांच्या परिश्रमामुळे पुण्यातील ज्यूदोचा प्रसार अत्यंत प्रभावशाली झाला व त्यांचे विद्यार्थी मोठ्या संख्येनी निर्माण झाले. पुण्यानंतर नाशिक, कोल्हापूर, अमरावती, सातारा अशा जिल्ह्यांमध्ये ज्यूदो चांगल्या पद्धतीने विस्तारत गेला, तर त्यानंतर ठाणे,औरंगाबाद, नागपूर आदी जिल्ह्यांत सेन्से श्री. खाणीवाले यांच्या हयातीमध्ये महाराष्ट्रात ज्यूदो नियमितपणे खेळला जाऊ लागला. सेन्से खाणीवाले यांच्या पहिल्या फळीतील विद्यार्थी दीपक टिळक, सारंग साठे, बाळ देवकर, शरद जोशी, प्रदीप मोहिते, विजय लिमये, रामचंद्र जोशी, श्रीनिवास कुलकर्णी, सुभाष जोशी, रत्नाकर पटवर्धन, धनंजय भोसले, पुरुषोत्तम चौधरी, राजकुमार पुनकर, ज्ञानेश्वर आग्ने यांसह अनेकांनी या खेळाच्या प्रसाराची धुरा वाहिली.

See also  झिंबाब्वेला दहा गडी राखून चिरडले; मालिका खिशात!

मुंबईत ज्यूदो संघटनेची स्थापना

महाराष्ट्रात प्रसार होतानाच मुंबई येथेही ज्यूदोच्या प्रसार-प्रचाराचे कार्य सुरू झाले होते. नारायण टी. बंगेरा (५ दान) हे प्रोफेसर टी. एम. सुवर्णा यांच्याकडून ‘ज्युज्युत्सु’ शिकलेले असल्याने त्यांनी ज्यूदो शिकून प्रभुत्व मिळवले. वर्ष १९६० मध्ये मुंबई ज्यूदो संघटनेची स्थापना करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. बंगेरा यांच्याबरोबर ज्यूदो प्रसारास मुंबईमध्ये एल. के. डागा, मोएज महम्मदली, के. एन. पस्ताकिया, के. डी. डॉक्टर, डॉ. बरोडावाला, अरशीष वाडिया, परवेज मिस्त्री आदींनी मोलाचे अंशदान दिले.

महाराष्ट्र ज्यूदो संघटनेची स्थापना

महाराष्ट्रात ज्यूदो वाढत असतानाच वर्ष १९६० साली, ‘महाराष्ट्र ज्यूदो संघटना’ संस्थेची स्थापना करण्यात आली. खेळाच्या वाढत्या व्याप्तीचे स्वरूप लक्षात घेता मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र अशा भौगोलिक आधारावर महाराष्ट्र-‘ए’ म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्र-‘बी’ म्हणजे महाराष्ट्र राज्यातील मुंबई वगळता इतर सर्व जिल्हे अशी रचना करण्यात आली. आज राज्यातील जवळपास २८-२९ जिल्हे राज्य ज्यूदो स्पर्धेमध्ये नियमितपणे सहभागी होतात. विशेष म्हणजे वर्ष २०२३ हे या राज्य स्पर्धांचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. राज्य ज्यूदो संघटनेचे वैशिष्ट्य म्हणजे संघटनेचे अध्यक्ष असलेले महाराजांचे वंशज अॅड. धनंजय भोसले आणि लोकमान्यांचे पणतू शैलेश टिळक संघटनेचे महासचिव आहेत.

                                                   लेखक : दत्ता आफळे

                                                                           लेखक राष्ट्रीय कोच आणि आंतरराष्ट्रीय पंच आहेत.