चौसष्ट घरांचे साम्राज्य आश्वासक हातांमध्ये..!

बाकू येथे नुकत्याच झालेल्या बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या आर प्रज्ञानन्द याने साऱ्या जगाचे लक्ष्य वेधून घेतले. सध्याचा जगज्जेता मॅगनस् कार्लसन याने ही स्पर्धा जिंकली असली तरी भारतीयांच्या हृदयात प्रज्ञानन्द याने आपले स्थान पक्के केले. अंतिम फेरीत प्रज्ञानन्द कार्लसनकडून पराभूत झाला असला तरी. अंतिम फेरीपर्यंत धडक मारताना त्याने दाखवलेली जिगर आणि जागतिक पातळीवर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या हिकरू नाकामुर आणि फॅबीयानो कॅरुआना यांना दिलेली मात, ही अठराव्या वर्षी अशी कामगिरी करणाऱ्या प्रज्ञानन्दच्या गुणवत्तेची महती अधोरेखित करण्यासाठी पुरेशी आहे.

या स्पर्धेत प्रज्ञानन्द याने भारताची गुणवत्ता वादातीत असल्याचे सिद्ध केलेच, पण उप उपांत्यपूर्व फेरी गाठलेल्या आठ खेळाडूंमधील चार जण भारतीय आहेत ही आपणा सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. (1) डोम्माराजू गुकेश अर्थात डी. गुकेश (2744 फिडे रेटिंग), 2) विदित गुजराथी (2719 फिडे रेटिंग), 3) अर्जुन एरिगासी (2710 फिडे रेटिंग) आणि 4) रामेशबाबू प्रज्ञानंदा (2690 फिडे रेटिंग.) हे भारताचे चार गुणवान खेळाडू शेवटच्या आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले. यातील 28 वर्षीय विदित सोडल्यास उरलेले तिघेही जेमतेम 18 वर्षांच्या आतले अत्यंत प्रतिभावंत खेळाडू आहेत. यांच्या व्यतिरिक्त निहाल सरीन, एस. एल. नारायणन, अभिमन्यू पुराणिक, अधिबन भास्करन, कार्तिक वेंकटरमन व हर्ष भरथकोटी या एकूण १० प्रतिभावंत खेळाडूंनी याच वर्ल्डकप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. १८,३४,००० डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयांमध्ये अंदाजे १५ कोटींपेक्षा जास्त रुपयांची बक्षीस रक्कम विजेत्या खेळाडूंमध्ये विभागली जाणार आहे. यातील विजेत्यास सर्वाधिक १,१०,००० डॉलर्स (म्हणजे अंदाजे ९३ लाख भारतीय रुपयांमध्ये) मिळणार आहेत. शेवटच्या आठ जणांमध्ये प्रवेश केल्यामुळे आपल्या चौघा भारतीयांनी किमान ३५ हजार डॉलर्स (भारतीय रुपयांमध्ये अंदाजे २९ लाख रुपये) चे बक्षीस तरी निश्चित केलेच आहे.

दोन स्पर्धा वेगळ्या

विश्वविजेता (World Champion) आणि विश्वचषक (World Cup Champion) विजेता या दोन्ही स्पर्धा वेगवेगळ्या आहेत. सध्याचा (२०२३) विश्वविजेता हा चीनचा डिंग लिरेन आहे, तर वर्ल्डकप विजेता (२०२२) पोलंडचा २५ वर्षीय जॉन ख्रिस्तोफ दूडा हा आहे. सध्या चालू असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत सुरुवातीला जगातील विविध देशांमधील सर्वोत्तम 206 खेळाडूंनी भाग घेतला होता. बाद फेरीने खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत जिंकणाऱ्या प्रत्येकाला किमान 8 जणांना पराजित करावे लागले आहे.

See also  लक्ष्य सेन दुसऱ्या फेरीत; हरमीतनेही मारली बाजी

टॉप दोन खेळाडूंना दिली मात

आपल्या गुणवान भारतीयांनी जागतिक क्रमवारीत प्रथम पाच स्थानांवर असणाऱ्या खेळाडूंपैकी दोघांना धूळ चारली आहे. भारतीयांमध्ये असलेली अफाट गुणवत्ता या निमित्ताने प्रथमच जगासमोर आली आहे.
आनंद दुसऱ्या स्थानावर
पाच वेळा विश्वविजेता असलेल्या आनंदने भारताचा झेंडा कायम एक हाती फडकावत ठेवला. जागतिक मानांकन यादीमध्ये अनेकदा प्रथम स्थानी विराजमान झालेला विश्वनाथन आनंद हा १९८८ च्या आधीपासूनच आंतरराष्ट्रीय मानांकनात भारतात प्रथम क्रमांकावर होता. गेली तब्बल 35 वर्षे तो भारतात प्रथम स्थानी होता. आता मात्र 35 वर्षांनंतर आनंदला द्वितीय स्थानी जावे लागले आहे. डी. गुकेशने स्वतः चे सर्वोच्च रेटिंग प्राप्त करत असतानाच जागतिक क्रमवारीत प्रथम दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळविले. त्याच वेळी स्वतःसह सर्व भारतीय खेळाडूंचे दैवत असलेल्या विश्वनाथन आनंदला सुद्धा द्वितीय क्रमांकावर ढकलले आहे.

पुण्यातील ५ ग्रँड मास्टर्स

विश्वनाथन आनंदनंतर कोण? या प्रश्नाचे समर्थ उत्तर या वर्ल्ड कप स्पर्धेमुळे भारतीयांना मिळाले आहे. भारतातील अफाट गुणवत्ता असलेल्या प्रतिभावंत खेळाडूंचा अंदाज खालील माहिती वाचल्यास नक्कीच येईल. सध्या भारतामध्ये ८३ ग्रँडमास्टर्स आहेत. यामध्ये पुण्यातील ५ ग्रँड मास्टर्सचा समावेश आहे. विशेष म्हणजे ८३ वा भारतीय ग्रँडमास्टर झालेला आदित्य सामंत हा 1७ वर्षीय पुणेकर खेळाडू आहे. भारताचा पहिला ग्रँडमास्टर हा १९८८ साली झाला. तो माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद. त्यानंतरच्या १२ वर्षांमध्ये (इ. स. २००० पर्यंत) म्हणजे पहिल्या तपामध्ये भारतातील ग्रँडमास्टर्सची संख्या फक्त ५ होती. त्यात दोघेजण महाराष्ट्राचे होते. ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे (मुंबई १९९७ साली) व अभिजित कुंटे (पुणे २००० साल) दिबेंद्यु बरूआ आणि के. शशीिकरण हे उरलेले दोघे.

२००० ते २०१२ या दुसऱ्या तपामध्ये २४ ग्रँडमास्टर्स भारतात तयार झाले. २०१२ ते २०२३ या तिसऱ्या तपामध्ये मात्र ११ वर्षांत तब्बल ५४ ग्रँडमास्टर्स तयार झाले आहेत. ५ : २४ : ५४ हे गुणोत्तर बघता चौथ्या तपाच्या अखेरीस जगातील सर्वात जास्त संख्येने ग्रँडमास्टर्स देखील भारतातूनच तयार होतील हे नक्की!…

See also  दुसऱ्या 'वन डे'मध्ये भारताचा पराभव!

१९८८ साली विश्वनाथन आनंद जेंव्हा भारताचा पहिला ग्रँडमास्टर झाला होता, तेंव्हा सोव्हिएत युनियन (USSR) देशांमधील फक्त रशियामध्ये किमान १०० पेक्षा जास्त ग्रँडमास्टर्स होते. १०० : १ च्या तुलनेत आजच्या घडीला रशियामध्ये २५६ ग्रँडमास्टर्स आहेत, तर भारतात ८३ म्हणजे ३ : १ या प्रमाणात खाली उतरले आहे. यावरून भारताची बुद्धिबळातली प्रगती, नव्हे तर झेप लक्षात येईल. याच वेळी फिडे मानांकित (FIDE Rated) खेळाडूंचे विविध देशांच्या तुलनेत भारताचे संख्याबल आश्चर्यचकित करणारे आहे.
सध्या भारतात (२०२२ अखेर) ५६४४६ खेळाडूंना जागतिक बुद्धिबळ संघटनेचे आंतरराष्ट्रीय मानांकन (FIDE rating) मिळाले आहे. ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च संख्या आहे. प्रथम क्रमांकावर रशिया असून, त्यांचे ५७०७१ खेळाडू हे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त आहेत. २०२३ अखेर भारत हा जगातील संख्येने सर्वात जास्त फिडे मानांकित खेळाडूंचा देश बनेल ही खात्री आहे.

                                                            लेखक : केतन खैरे 

                                        लेखक प्रसिद्ध खेळाडू व प्रशिक्षक आहेत.