मन:शक्तीचे बळ वाढवणे हीच यशाची पहिली पायरी

Pensive businessman with abstract brain sketch on light background. Creative mind concept

आजकालचे युग हे स्पर्धात्मक युग म्हणून ओळखले जाते, साहजिकच आपल्या पाल्याकडे सर्व पालकांचे जातीने लक्ष असते. आजकालचे पालक आपले मूल पाळण्यातच असताना मोठे होऊन कोण होईल, याची स्वप्न बघत असतात. डॉक्टर, इंजिनीअर आणि अनेक व्यावसायिक मार्गावर ते मुलांचा हात धरून त्यांना पुढे नेत असतात. भारतामध्ये अभ्यासाबरोबरीने इतर प्रकारात पुढे जाण्यासाठी पालक मुलांना प्रोत्साहन देत असतात. उदा. नाच, गाणे, खेळ, अभिनय वगैरे.
आपण ह्या लेखात खेळावर लक्ष केंद्रित करणार आहोत.

मूल साधारण ५ ते ६ वर्षाचे झाले की, त्यांना आपण मैदानावर खेळायला घेऊन जातो. सांघिक खेळ, वैयक्तिक खेळ असे आपापल्या आवडीप्रमाणे खेळ शिकण्यासाठी व त्यात प्रावीण्य मिळवण्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहन देतो. मुलाचं नाव खेळातल्या एखाद्या चांगल्या प्रशिक्षकाकडे मार्गदर्शनासाठी नोंदवतो आणि निर्धास्त होतो. पण जसजसं मूल प्रावीण्य मिळवू लागतं, तसं त्याच्या समोरची आव्हाने वाढू लागतात, त्याचबरोबर अडचणीही हातात हात घालून पुढे येतात. असं झालं की मात्र आपण हताश होतो. मूल पण नाराज होऊ लागतं. त्याला पुढचा मार्गच दिसत नाही.

निराशा टाळण्यासाठी

हे सर्व जर आपल्याला टाळायचं असेल आणि पाल्याला कणखर करायचे असेल तर त्याच्या सर्वांगीण विकासावर बारकाईने लक्ष द्यावे लागेल. खेळाडू खेळताना रोज त्या खेळाचा भरपूर सराव करत असतो. नवनवीन खाचाखोचा आत्मसात करतो. त्याचबरोबरीने शारिरीक तंदुरुस्तीसाठी आवश्यक तो व्यायाम करतो, जेणेकरून त्याची ताकद आणि क्षमता वाढण्यास मदत होते. परंतु याचबरोबर मनाची तंदुरुस्ती आणि मानसिक क्षमता चांगली होण्याचीदेखील जरुरी असते. तसे करण्यासाठीच ‘खेळाचं मानसशास्त्र’ समजून घेणे आवश्यक आहे.

खेळाचे मानसशास्त्र कधीपासून चालू करावे?

साधारणपणे आपल्या मुलाचे खेळातील प्रावीण्य वाढू लागले आणि तो स्पर्धात्मक खेळासाठी तयार होऊ लागला की, त्याला आपण खेळातील मानसशास्त्र पदवी ग्रहण केलेल्या तज्ज्ञाकडे नेऊ शकतो. आपण आपल्या मुलांना घरामध्ये संस्कार देतो तेवढेच हे देखील (मानसशास्त्र तज्ज्ञाचा सल्ला) महत्त्वाचे आहे. त्यामुळे पाल्याला पहिल्यापासून सकारात्मक, आणि चांगले विचार करण्याची सवय लागते. ‘मॅच टेंपरामेंट’ म्हणजे सामन्याच्या आधी काय मानसिकता / विचार असावेत, तसेच मॅचमध्ये काय विचार करावा, त्याचा त्यांना सराव होतो आणि त्यामुळे अटीतटीच्या सामन्यांच्या वेळी त्याचा फारच फायदा होऊ शकतो.

See also  युवा खेळाडूंसाठी शास्त्रीय सल्ले!

छोटंसं उदाहरण म्हणजे बहुतेक पालक आपल्या पाल्यांना लहानपणीच छोटीशी बॅडमिंटन रॅकेट, क्रिकेटची बॅट आणून देतात आणि त्यांच्याबरोबर खेळतात, तेव्हा ते मूल जणूकाही पी. व्ही. सिंधू किंवा सचिन तेंडुलकर असल्यासारखे खेळतात आणि पालकही त्यांना प्रोत्साहन देतात, परंतु ते मूल जेंव्हा प्रशिक्षण घ्यायला सुरुवात करते, तेंव्हा त्यांचा भ्रमनिरास होतो; कारण घरातल्या सचिनच्या बॅटला चेंडूचा स्पर्शच होत नाही किंवा सिंधूच्या रॅकेटची शटलशी भेटच होत नाही. कारण त्यांना त्या साधनांची खरीखुरी ओळखच मुलांना नसते. मग त्यांचे प्रशिक्षक त्यांना बॅट, रॅकेट इ.ची ओळख करून देऊन खेळातील तांत्रिक गोष्टी समजावून त्यांच्याकडून सराव करून घेतात. अशाच प्रकारे जर त्या खेळाडूने मानसिक तंदुरुस्तीसाठी सराव केला, तर त्याचा निश्चितच भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो.

सकारात्मक विचारांचाही सराव हवा

बरेच खेळाडू खराब फटका मारला किंवा मॅच पॉईंट गेला, तर आरडाओरडा / चिडचिड करतात, परंतु ही लक्षणं चांगली नाहीत. त्यासाठीच त्यांना पहिल्यापासून शांतपणा, संयम, चिकाटी यासारख्या पैलूंची ओळख करून घ्यायला हवी. त्याचा सराव, म्हणजेच सकारात्मक विचारांचा सराव त्यांनी केल्यास त्यांच्याकडून कायम चांगली आणि जबाबदार वागणूक घडेल. जेणेकरून ते एक चांगला खेळाडू आणि चांगला माणूस म्हणून तयार होतील.

मेंटल टफनेसची ५ सूत्रे

मेंटल टफनेस म्हणजे खेळाडूमध्ये एक प्रकारची जिद्द, चिकाटी आणि एकाग्रता असणे, तसेच मॅच खेळताना जरी आपण पिछाडीवर असलो तरी पुढे मीच जिंकू शकतो अशा पद्धतीचा आत्मविश्वास असणे. तो कसा येईल तर त्यासाठी ५ सूत्रे आहेत. टी अशी (१) रोजनिशी (डायरी) लिहिणे (२) श्वासाचं संयोजन करणे (ब्रिदिंग टेक्निक) (3) स्वतःची जाणीव असणे (सेल्फ अवेअरनेस) (४) स्वतःच स्वत:शी बोलून स्वतःला प्रोत्साहित करणे (५) अंत:चक्षूने आपल्याला हव्या असलेल्या ध्येयापर्यंत पोहोचणे (व्हिज्युलायझेशन). या ५ सूत्रांवर काम करून ती सर्व आत्मसात करणे, त्याचा सराव करून आत्मविश्वास दृढ करणे आणि ह्यासाठी खेळाच्या मानसशास्त्रज्ज्ञाचा सल्ला / मदत घेणे आवश्यक आहे.
ज्या प्रकारे खेळाडू पायातली ताकद वाढवण्यासाठी स्कॉट करतो, हातापायाच्या ताकदीसाठी वजन उचलणे, जोर/बैठका करणे इ. प्रकारे शारिरीक ताकद‌ वाढवून शरीर बलवान करतो, तसेच वर सांगितलेल्या ५ सूत्रांचा वापर करून मन कणखर बनवता येते.

See also  हॉकी : भारताला आणखी एक कांस्यपदक!

मानसशास्त्रज्ञ नक्की काय करतो, तर तो खेळाडू, त्याचे पालक आणि त्याचे प्रशिक्षक या सर्वांबरोबर चर्चा करून त्या खेळाडूचं ध्येय, पालकांच्या अपेक्षा आणि आपसातले संबंध, प्रशिक्षक – खेळाडू यांच्यातील समन्वय या सर्व गोष्टींचा अभ्यास करतो आणि त्या प्रत्येकातील विशिष्ट कौशल्याचा वापर खेळाडूला यशस्वी होण्यासाठी कसा करता येईल, याचा विचार करून त्याच्याशी समन्वय साधतो. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या मर्यादेत राहून आपण शंभर टक्के एफर्ट्स देण्याचा प्रयत्न करतो.

                                                                    डॉ. गायत्री वर्तक

                                                   मानसोपचार तज्ज्ञ व क्रीडा मन्स शास्त्रज्ञ