लंडन : वृत्तसंस्था
अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या विंबल्डन टेनिस स्पर्धेत यंदा झेक प्रजासत्ताकाची बार्बरा क्रिचिकोवा हिने महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकावले. हे तिचे विंबल्डनमधील पहिलेच अजिंक्यपद असल्याने विम्बल्डनला नवी राणी मिळाली आहे. २०२१ मध्ये क्रिचिकोवाने फ्रेंच ओपनचे अजिंक्यपद पटकावले होते. त्यामुळे यंदाचे विंबल्डन अजिंक्यपद हे तिच्यासाठी दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले आहे.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या समन्यात ३१ व्या मानांकित क्रिचिकोवाने इटलीच्या सातव्या मानांकित जॅस्मिन पाओलिनी हीचा तिन सेट्स मध्ये पराभव केला. पाठीच्या दुखण्याने डोके वर काढलेले असतानाही क्रिचिकोवाने संपूर्ण स्पर्धेत आपल्या आक्रमक खेळाने टेनिस शौकिनांना उत्कृष्ट टेनिसचे प्रात्यक्षिक दाखवले आणि अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. अंतिम फेरीतही तिने हीच आक्रमकता कायम ठेवताना पहिलं सेट ६-२ असा सहज जिंकला.
दुसऱ्या सेटमध्ये मात्र पाओलिनीने आपल्या खेळत जबरदस्त सुधारणा करीत हा सेट ६-२ असा एकतर्फी जिंकत आपण हा सामना सहजा सहजी सोडनार नसल्याचाच इशारा दिला. मात्र जिगरबाज क्रिचिकोवाने तिसऱ्या सेटमध्ये आक्रमकता आणि संयम यांचा सुरेख मेल घालत आपली सर्व्हिस राखताना पाओलिनीची सर्व्हिस भेदत आघाडी घेतली आणि हा सेट ६-४ असा जिंकत अजिंक्यपदाला गवसणी घातली.