भारतीय महिलांचेही आफ्रिकेवर वर्चस्व! एकमेव कसोटीत १० गडी राखून विजय, फिरकीपटू स्नेह राणा सामनावीर

चेन्नई : भारतीय पुरुष संघाचा कित्ता गिरवत भारतीय महिला संघानेसुद्धा क्रिकेटच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेला धूळ चारण्याचा पराक्रम केला. भारत-आफ्रिका यांच्यातील एकमेव कसोटी सामन्यात भारताने १० गडी राखून दणदणीत विजय नोंदवत जेतेपदाचा चषक पटकावला. फिरकीपटू स्नेह राणाने दोन्ही डावांत मिळून १० बळी मिळवत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियमवर झालेल्या या लढतीत आफ्रिकेचा दुसरा डाव ३७३ धावांत संपुष्टात आल्यानंतर भारताने ३७ धावांचे लक्ष्य ९.२ षटकांत गाठले. शफाली वर्माने ३० चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह नाबाद २४, तर स्मृती मानधनाने २६ चेंडूंत १ चौकारासह नाबाद १३ धावा केल्या. आता उभय संघांत ५ जुलैपासून चेन्नईतच ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येईल.

रविवारच्या २ बाद २३२ धावांवरून पुढे खेळताना आफ्रिका १०५ धावांनी पिछाडीवर होती. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारताच्या पहिल्या डावातील ६०३ धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेचा पहिला डाव २६६ धावांतच आटोपला होता. त्यामुळे भारताने त्यांच्यावर फॉलोऑन लादला. सोमवारी लढतीचा अखेरचा दिवस असल्याने आफ्रिकेला अधिकाधिक षटके फलंदाजी करणेही गरजेचे होते. तिसऱ्या दिवशी सून लूसने शतकाद्वारे प्रतिकार केला. तर सोमवारी कर्णधार लॉरा वोल्वर्डने १६ चौकारांसह कसोटी कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले. तिला नॅडिन डी क्लर्कने ६१ धावांसह सुरेख साथ दिली.

मात्र या दोघी माघारी परतल्यावर आफ्रिकेचा डाव घसरला. त्यामुळे आफ्रकेने दुसऱ्या डावात १५४.४ षटाकांत ३७३ धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या डावात ८ बळी घेणाऱ्या राणाने दुसऱ्या डावात २ गडी टिपून सामन्यात १० बळी मिळवण्याची किमया साधली. तिला दीप्ती शर्मा व राजेश्वरी गायकवाड या फिरकीपटूंनीही प्रत्येकी दोन बळी मिळवून उत्तम साथ दिली.

भारतापुढे मग विजयासाठी माफक ३७ धावांचे लक्ष्य उभे ठाकले व त्यांनी सहज विजय मिळवला. भारताकडून पहिल्या डावात शफालीने द्विशतक, तर स्मृतीने शतक साकारले होते. मात्र फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर राणाने दोन्ही डावांत प्रभावी गोलंदाजी केल्याने तिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. १९७६नंतर प्रथमच चेन्नईत महिलांच्या कसोटी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या वर्षभरात भारताने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि आता आफ्रिका अशा बलाढ्य संघांना कसोटी मालिकेत धूळ चारली आहे. या सर्व मालिका भारताने मायदेशात जिंकल्या. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास चांगलाच बळावला आहे.

See also  कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेने ब्रॉन्झ जिंकले!