चॅम्पियन बनण्यासाठी हवी जिगर, कठोर परिश्रम

अनेक तरुण खेळाडूंना कार्लोस अल्काराझ किंवा जोकोविचसारख्या आपल्या टेनिसमधील दैवतासारखे टेनिस खेळण्याचे स्वप्न स्वस्थ बसू देत नसेल. मात्र, चॅम्पियन बनण्यासाठी केवळ आकांक्षा आणि प्रतिभा एवढेच पुरेसे नाही, तर यापेक्षा बरेच काही आवश्यक असते.
विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्सचा अनुभवी टेनिस प्रशिक्षक म्हणून मला आशा उत्साही तरुण आणि त्यांच्या पालकांशी अनेक वेळा संवाद साधण्याची संधी मिळते. आमच्या फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमीमध्ये आपल्या मुलांना रॉजर फेडरर किंवा सेरेना विल्यम्स बनविण्यास उत्सुक असलेल्या असंख्य पालकांना मी भेटलो आहे. अशी महत्त्वाकांक्षा कौतुकास्पद असली तरी, पालकांनी खेळाचे खरे सार समजून घेणे आणि त्यासाठी मुलाकडून आणि स्वत: देखील यासाठी आवश्यक असलेली वचनबद्धता समजून घेणे महत्त्वाचे आहे.

टेनिस सुरू करण्याआधी ….

भविष्यातील चॅम्पियन बनवण्याआधी, टेनिस या खेळाच्या त्या मुलाच्या आवडीमागील प्रारंभिक प्रेरणा ओळखणे आवश्यक आहे. निरोगी जीवनशैलीला चालना देणे, चारित्र्य निर्माण करणे, मित्र बनवणे आणि बाह्य क्रियाकलापांचा आनंद घेणे ही प्राथमिक कारणे त्यासाठी असावीत. चॅम्पियन बनण्याची आकांक्षा नंतर येते. उत्तुंग यशासाठी योग्य पाया घालताना, अटल वचनबद्धता, कठोर परिश्रम आणि इतर विविध घटकांचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.

टेनिसचा प्रत्यक्ष प्रवास

एकदा मुलाने आनंदासाठी टेनिस खेळायला सुरुवात केली की, प्रशिक्षक त्याच्यातील संभाव्य गुणवत्ता आणि इछाशक्ती पारखून त्यात कशी सुधारणा करता येईल आणि त्याचे कौशल्य आणखी कसे वाढवता येईल याचा विचार करू शकतो. या महत्त्वाच्या टप्प्यात, 10-12 वर्षांपर्यंतच्या मुलांनी इतर खेळांमध्ये, शक्यतो फुटबॉल, बास्केटबॉल किंवा हॉकी यांसारख्या सांघिक खेळांमध्ये भाग घेतल्यास त्यांची शारीरिक आणि मानसिक प्रगती वेगाने होऊ शकते. सांघिक खेळांमध्ये गुंतल्याने मुलांमध्ये सांघिक कार्य, लवचिकता आणि शारीरिक कणखरपणा निर्माण होतो, जे नंतर त्यांच्या टेनिसमधील उत्कर्षाच्या दृष्टीने अत्यंत अमूल्य भांडवल बनते. याव्यतिरिक्त, पोहणेदेखील टेनिससाठी एक उत्कृष्ट पूरक व्यायाम आहे, संपूर्ण शरीराची तंदुरुस्ती, हात-डोळा समन्वय आणि योग्य वृत्तीला प्रोत्साहन देते.

See also  नव्या कर्णधाराचा निर्णय निवड समितीच्या हाती! बीसीसीआयचे सचिव जय शहा यांची माहिती; आगरकरशी लवकरच साधणार संवाद

चॅम्पियनशिपचा मार्ग

वयाच्या १२व्या वर्षी, चॅम्पियन बनण्याचा खरा प्रवास सुरू होतो. “१० हजार तासांच्या नियमावर” आधारित विचार केल्यास सुमारे १० वर्षांचा समर्पित आणि योग्य सराव टेनिसच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचण्याची १० टक्के शक्यता निर्माण करू शकतो. या ‘१० हजार तासांच्या नियमानुसार’ शारीरिक आणि मानसिक प्रशिक्षणासह, विश्रांतीचे दिवस वगळून, अंदाजे 3-4 तासांच्या दैनंदिन सरावाला यात पर्याय नाही. उत्कृष्टतेच्या या मार्गामध्ये वर्षभर स्पर्धेसाठीचा प्रवास, विजय आणि पराभवांना सामोरे जाणे, यशामध्ये नम्रता राखणे आणि एखाद्याच्या प्रवासात नशिबाची भूमिका स्वीकारणे हेदेखील यात समाविष्ट आहे.

पालकांची भूमिका महत्त्वाची

एखाद्या महत्त्वाकांक्षी चॅम्पियनचे नशीब घडवण्यात पालकांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. आपल्या मुलाने टेनिस चॅम्पियन होण्याचे स्वप्न मनापासून पाहिले आहे की नाही आणि निकालाची पर्वा न करता आपल्या मुलाच्या महत्त्वाकांक्षेला समर्थन देण्यासाठी १०० टक्के वचनबद्धतेची त्याची तयारी आहे की नाही, याचे वेळीच मूल्यांकन करणे महत्त्वाचे आहे. पालकांचे प्रोत्साहन, विशेषत: पराभवाच्या कठीण काळात अत्यावश्यक आहे. या प्रवासात मुलाला स्वतःच्या जिवावर एकट्यानेच हा प्रवास करावयाचा असल्याने त्याच्यासाठी पालकांचे पाठबळ इंधनाचे काम करते. विजय आणि पराभव या दोन्ही वेळी उपस्थित राहिल्याने पालक आणि मुलामधील बंध मजबूत होतात आणि एक लवचिक आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व घडविण्यात खेळाडूला मोलाची मदत होते.

एक जीवन बदलणारा अनुभव

जरी प्रत्येक मूल टेनिसच्या यशाच्या शिखरावर पोहोचू शकत नसले, तरी या खेळात गुंतल्याने त्याला जीवन बदलणारे आणि त्याचे व्यक्तिमत्त्व समृद्ध करणारे अनेक फायदे मिळतात. टेनिस हा एक जगभर सार्वत्रिक खेळला जाणारा खेळ आहे. त्यामुळे या क्षेत्रात आलेल्या खेळाडूला अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. अमेरिकेतील महाविद्यालयीन शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंबरोबर मैत्रीसह जगभरातील अनेक संधींचा त्यात समावेश आहे. शिवाय, यासंदर्भात झालेले अनेक अभ्यास असे सूचित करतात की, टेनिस खेळाडू सामान्यत: दीर्घ आणि निरोगी आयुष्याचा आनंद घेतात, हे त्यांच्यासाठी एक वरदानच ठरते.

See also  भारतीय खेळाडू करताहेत जग पादाक्रांत!

यावरून असा निष्कर्ष निघतो की, टेनिस चॅम्पियन बनण्याच्या प्रवासात खेळाडूचे शंभर टक्के समर्पण, अथक चिकाटी आणि पालकांचा भक्कम पाठिंबा याची नितांत गरज आहे. टेनिस दिग्गजांचे अनुकरण करण्याचे स्वप्न वाखाणण्याजोगे असले तरी, मुलाची खेळाबद्दलची आवड आणि त्यांचा वैयक्तिक विकास याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. केवळ चॅम्पियनशिपचाच विचार न करता, टेनिसमध्ये गुंतल्याने मिळणाऱ्या विविध संधी, मैत्रीपूर्ण आणि निरोगी, परिपूर्ण जीवनाचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडू शकतात. म्हणून टेनिस कोर्टवर तुमच्या मुलाचा प्रवास हा समृद्ध जीवनाचा, त्याच्या वाढीचा आणि आत्म-शोधाचा उत्सव होऊ द्या.

लेखकाबद्दल थोडे

नंदन बाळ

नंदन बाळ हे टेनिस जगतातील एक प्रमुख व्यक्तिमत्व असून, सध्या ते अखिल भारतीय टेनिस असोसिएशनच्या निवड समितीचे अध्यक्ष आहेत. 30 वर्षांच्या प्रभावी कोचिंग कारकीर्दीसह, त्यांनी भारतीय खेळाडुंमधील प्रतिभा आणि भारतीय डेव्हिस कप संघाला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या खेळातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने टेनिसमधील आजीवन योगदानासाठी प्रतिष्ठित ध्यानचंद पुरस्काराने त्यांचा गौरव केला आहे.
अखिल भारतीय टेनिस असोसिएशन निवड समितीचे अध्यक्ष या नात्याने, नंदन बाळ हे देशभरातील गुणवंत टेनिसपटूंना शोधण्यात आणि त्यांच्या गुणवत्तेला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यामुळे भारतीय संघाला एक चांगला आकार येतो. त्यांच्या अनुभवाचा खजिना आणि प्रतिभेची तीक्ष्ण नजर यामुळे भारताचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता असलेल्या आशादायक खेळाडूंची निवड त्यांना करता येते. जे आंतरराष्ट्रीय टेनिसच्या सर्वोच्च स्तरावर भारताला नक्कीच मनाच्या स्थानी घेऊन जाऊ शकतात.

                                                                                                       लेखक : नंदन बाळ

                                                                                         (लेखक हे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय खेळाडू व कोच)