खरेतर क्रिकेट हा पुरुषप्रधान खेळ म्हणून ओळखला जाणारा खेळ, पण पन्नास वर्षांपूर्वी महिलाही क्रिकेटच्या मैदानात हिरिरीने उतरल्या. १९७३ सालापासून सुरू झालेला महिला क्रिकेटचा प्रवास आज 50 वर्ष पूर्ण करीत मोठ्या शिखरावर पोचला आहे. आज महिला क्रिकेट शालेय स्तरापासून जगभरात मोठ्या आवडीने खेळला जात आहे. सुरुवातीच्या काळात अनेक महिला खेळाडूंना मैदानावर जायलासुद्धा अनेक पातळ्यांवर परवानगी घ्यावी लागत असे. घराच्या बाहेर पडणे सोडाच स्वतःच्या संदर्भातील निर्णय घेण्याचेही त्यांना स्वातंत्र्य नव्हते. मग मैदानावर कौशल्य आजमावायची तर बातच नव्हती. अशा अनेक समस्यांनी महिला खेळाडूंचा कोंडमारा होत असे; मात्र अनेक महिला खेळाडूंनी आपल्या कर्तृत्वाने समाजात मानाचे स्थान पटकावले आणि समाजाची ही मानसिकता बदलत गेली. महिला क्रिकेटमध्ये त्यानंतर खेळाडूंची संख्या हळूहळू वाढू लागली. महाविद्यालयांमध्ये पण महिला क्रिकेट सुरू झाले आणि अांतर महाविद्यालयीन सामने पण व्हायला लागले.
परंतु असे असले तरी, Graduation किंवा post graduation पर्यंत खेळून नंतर नोकरी करणे हाच पर्याय महिला खेळाडू निवडत होत्या. स्वतःच्या घरात न सांगता खेळणे, नाव बदलून खेळणे अशा गोष्टी हमखास घडत. हे सगळं फक्त क्रिकेटच्या प्रेमापोटी. खेळाची प्रचंड आवड होती म्हणून. पण काळ बदलला तशी अभ्यास, नोकरी आणि खेळ हे सगळं एकत्र करणे म्हणजे तारेवरची कसरत होऊ लागली आणि अनेक मुलींचं क्रिकेट बंद झालं.
रेल्वे आणि एअर इंडियाची साथ
आज महिला क्रिकेटचं चित्र संपूर्णपणे बदलले आहे. महिला क्रिकेटकडे एक प्रोफेशन करिअर म्हणून आता बघितलं जात आहे. अनेक मुलींना /महिलांना BCCI कडून संधी उपलब्ध होत आहे. रेल्वे आणि एअर इंडियासारख्या संस्थांनी अनेक महिला खेळाडूंनाही नोकरी उपलब्ध करून दिली आहे. महाविद्यालयांमधूनही त्यांना चांगल्या संधी मिळत आहेत.
अनेक संधी उपलब्ध
क्रिकेटच्या क्षेत्रात आल्यानंतर मुलींना नुसतं क्रिकेट खेळायलाच नाही, तर क्रिकेटच्या क्षेत्रातील अनेक पर्यायांची दारे उघडली आहेत. फिटनेस ट्रेनर, कोचिंग, फिजिओथेरपिस्ट, अंपायरिंग, स्कोरींग, मॅच रेफ्री, व्हिडिओ अॅनालिस्ट, मानसिक आरोग्य प्रशिक्षक (mental training coach). अशा अनेक क्षेत्रात महिला खेळाडू आता आपले वर्चस्व दाखवीत आहेत. स्वतःचं स्थान निर्माण करत आज काही महिला-पुरुषांच्या रणजी करंडकाच्या सामन्यामध्ये अंपायरिंग, मॅच रेफ्री म्हणून काम करत आहेत.
महिलांची प्रीमियर लीग
भारतासह जगभरात लोकप्रिय झालेल्या पुरुषांच्या आयपीएल (IPL) प्रमाणेच महिलांच्या आयपीएलला WIPL मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत असून, महिलांच्या कामगिरीलाही तेवढीच लोकप्रियता मिळत आहे. 2017च्या महिला विश्वचषकानंतर महिला खेळाडूंचा मानसन्मान वाढला आहे. अनेक व्यावसायिक कंपन्यांनी प्रायोजकत्वचा (sponsorship). हात पुढे केला आहे. ह्युनदाई, नाइके, यांसारख्या कंपन्यांनी या खेळाडूंच्या कारकिर्दीला आधार दिला आहे. मिथली राज, झुलन गोस्वामी, स्मृती मांधना, हरमनप्रीत कौर अशा अनेक खेळाडू आज घराघरात पोचल्या आहेत. उभरत्या खेळाडूंसाठी त्या प्रेरणास्त्रोत (Inspiration) झाल्या आहेत. अनेक वर्षांचा खडतर प्रवास आणि कष्टांचे फळ आताच्या महिला क्रिकेट खेळाडूंना मिळत आहे. पन्नास वर्षांच्या प्रवासात आलेल्या भल्या बुऱ्या अनुभवांच्या जोरावर महिला क्रिकेट आणखी चमकदार आणि रोमांचक बनेल यात शंका नाही.
लेखिका : सोनिया डबीर
लेखिका माजी राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक आहेत.