झिंबाब्वेने दिला भारताला धक्का! १३ धावांनी केला पराभव

sikandr Raza
सामन्याचा मानकरी सिकंदर रझा

हरारे : वृत्तसंस्था 

टी २० विश्वकप जिंकून झिंबाब्वे दौऱ्यावर पोहोचलेल्या भारतीय संघाला पहिल्याच टी २० समन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला. झिंबाब्वेने दिलेले अवघे ११६ धावांचे लक्ष देखील भारतीय संघ गाठू शकला नाही. भारताचा अख्खा संघ अवघ्या १०२ धावांमध्ये तंबूत परतला. कर्णधार शुभमन गिल (३१), वॉशिंग्टन सुंदर (२७) आणि आवेश खान (१६) या तिघांव्यतिरिक्त एकाही भारतीय फलंदाजाला दोन अंकी धावसंख्या गाठता आली नाही.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारण्याच्या कर्णधार शुभमन गिल याचा निर्णय सार्थ ठरवताना भारतीय गोलंदाजांनी झिंबाब्वेच्या फलंदाजांना बांधून ठेवले. रवी बिश्नोई (४ बळी), वॉशिंग्टन सुंदर (२ बळी) आणि मुकेश कुमार व आवेश खान यांनी प्रत्येकी एक बळी घेत झिंबाब्वेला ९ बाद ११६ धावांवर रोखले. आघाडिवीर वेस्ले मेधेवेर (२१ धावा), ब्रायन बेनेट (२३ धावा), डेऑन मेरेक्स (२३) आणि कलाईव्ह मादांडे (नाबाद २९ यांनी) भारतीय गोलंदाजीचा थोडाफार प्रतिकार केला.

गोलंदजांनी आपली कामगिरी चोख बजावली मात्र फलंदाजांना त्याचा फायदा घेता आला नाही. पहिला पॉवर प्ले मध्येच भारताची फलंदाजी पत्त्याच्या बांगल्याप्रमाणे कोसळली. पदार्पण करणाऱ्या अभिषेक शर्माला खतेही उघवता आले नाही, तर माजी कर्णधार ऋतुराज गायकवाड ७ धाववर बाद झाला. आयपीएल मध्ये धमाका करणाऱ्या रियन प्रयागलाही लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. तो दोन धावांवर बाद झाला. पाच षटकांत भारताची अवस्था ४ बाद २२ अशी केविलवाणी झाली होती. त्यानंतरही गिल आणि सुंदर वगळता कोणताच फलंदाज झिंबाब्वेच्या गोलंदाजांसामोर टिकू शकला नाही. आणि भारतीय संघ अवघ्या १०२ धावांत गुंडाळला गेला.

२०१६ नंतर झिंबाब्वेने भारताविरुद्ध मिळविलेला हा पहिला विजय ठरला. त्यातच झिंबाब्वेने सलग १२ टी २० सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाची विजयी मालिका खंडित केली. १७ धावा आणि ३ बळी घेणार झिंबाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा सामन्याचा मानकरी ठरला.

See also  रोईंगमध्ये बलराज पनवर चौथ्या स्थानी; उपांत्यपूर्व फेरी हुकली