बांगलादेशचा धुव्वा!

Asia cup cricket
Asia cup cricket

Asia cup cricket | श्रीलंकेतील डंबूला येथे सुरू असलेल्या महिलांच्या आशियाई कप क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघाने बांगलादेश संघाचा दहा गडी राखून दणदणीत पराभव करीत दिमाखात अंतिम फेरी गाठली.

शुक्रवारी झालेल्या आशिया कप स्पर्धेच्या उपांत्यफेरीत बांगलादेशच्या महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र रेणुका सिंग हिच्या धारधार माऱ्यापूढे बांगलादेशचा संघ पत्त्याच्या बांगल्याप्रमाणे कोसळला. त्यांची आघाडीची फळी दोन आकडी धावसंख्याही गाठू शकली नाही. त्यांचा निम्मा संघ अवघ्या ३३ धावांत तंबूत परतला होता.

रेणुकाची दहशत Asia cup cricket |

रेणुका सिंगने बांगलादेशची आघाडीची फळी अक्षरश: कापून काढली. तिने आपल्या चार षटकांत केवळ १० धावा देत पहिल्या ३ फलंदाजांना तंबूत पाठविले. राधा यादवनेही आपल्या ४ षटकांत १४ धावांत ३ बळी मिळविले. बांगलादेशच्या महिलांना निर्धारित २० षटकांत केवळ ८ बाद ८० धावा करता आल्या. बांगलादेशची कर्णधार सुलताना हिने एका बाजूने ५१ चेंडू खेळून २ चौकरांसह ३२ धावा केल्या; मात्र बाकीच्या फलंदाजांचा भारतीय महिलांच्या तिखट माऱ्यापूढे टिकाव लागू शकला नाही.

स्मृतीचे अर्धशतक Asia cup cricket |

डावखुऱ्या स्मृती मानधनाने कोणत्याही बांगलादेशी गोलंदाजाला डोके वर काढू दिले नाही. अवघ्या ३९ चेंडूत ९ चौकार आणि एक षटकार ठोकत स्मृतीने ५५ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूने शेफाली वर्मा हिने आज ‘अँकर’ची भूमिका बजावताना २८ चेंडूत २ चौकरांसह २६ धावा केल्या.

निर्धारित २० षटकांत भारतीय संघाने एकही गडी न गमावता सामना खिशात घातला आणि आशिया कप क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. स्मृती आणि शेफाली या आक्रमक आघाडीवीरांनी भारताला ११ व्या षटकातच सामना जिंकून दिला.

धावफलक : बांगलादेश : डी. अक्तर झे. चेत्री गो. रणूक ६, एम. खातून झे. शेफाली गो. रेणुका ४, आय. तांजुम झे. तनुजा गो. रेणुका ८, एन. सुलताना झे. दीप्ती शर्मा गो. राधा यादव ३२, आर. अहमद त्रि. गो. राधा यादव १, आर. मोनी यष्टीचीत ऋचा घोष गो. दीप्ती शर्मा ५, एस. अक्तर नाबाद १९, एन. अक्तर त्रि. गो. राधा यादव ०, एम. अक्तर नाबाद ०, अवांतर ४. एकूण २० षटकांत ८ बाद ८०. बाद होण्याचा क्रम : १/७, २/१७, ३/२१, ४/३०, ५/३३, ६/४४, ७/८०, ८/८०. गोलंदाजी : रेणुका सिंग ४-१-१०-३, पूजा वस्त्राकर ४-०-२५-१, टी. कंवर ४-०-१६-०, दीप्ती शर्मा ४-०-१४-१, राधा यादव ४-१-१४-३. भारत : शेफाली वर्मा नाबाद २६, स्मृती मानधना नाबाद ५५, अवांतर २. एकूण ११ षटकांत बिनबाद ८३. गोलंदाजी : एम. अक्तर २-०-१७-०, एन. अक्तर ३-०-३४-०, जे. आलम ३-०-१७-०, आर. खातून २-०-१०-०, आर. अहमद १-०-५-०.

See also  लक्ष्य सेन दुसऱ्या फेरीत; हरमीतनेही मारली बाजी