खेळाडूंसाठी आहार अत्यंत महत्त्वाचा

Health food for fitness concept with fresh fruit, vegetables, pulses, herbs, spices, nuts, grains and pulses. High in anthocyanins, antioxidants,smart carbohydrates, omega 3 fatty acids, minerals and vitamins.

मानवी शरीर एका चैतन्यानं भरलेलं आणि भारलेलं असतं. या चैतन्याच्या मागे शरीरात निर्माण होणारी ऊर्जा कारणीभूत असते. ही ऊर्जा दररोज सेवन करत असलेल्या आहारातून मिळत असते. त्यामुळेच तर भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे की,
युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु। युक्तस्वप्नाव बोधस्य योगो भवति दु:ख:।।
म्हणजेच सुयोग्य आहार आणि विहाराने शारिरीक व मानसिक अशा सर्व प्रकारच्या आजारांपासून मानवी शरीर दूर राहते.

विद्यमान स्थिती आणि पोषक वातावरण

माहिती तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात क्रीडा क्षेत्रात भवितव्य घडविण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यावर माहिती मिळविण्यासाठी अनंत स्रोत उपलब्ध झाले आहेत. यामुळे देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातील कोणत्याही खेळाडूला संधींचे अवकाश खुले झाले आहे. खेळाडूंच्या आहाराच्या बाबतही अनेक तज्ज्ञ मार्गदर्शक उपलब्ध झाले आहेत.
कोविड संक्रमणानंतर जागतिक स्तरावर वनस्पतीजन्य आहार (Plant Nutrition) आणि उत्पादनांची मागणी आणि निर्मिती वाढली आहे. संपूर्ण जगाचं लक्ष नैसर्गिक व्याधी प्रतिकारक्षमता (Immunity) आणि खेळातील कामगिरी उंचावण्यासाठी नैसर्गिक (Plant Nutrition) आणि प्राचीन आरोग्यशास्त्राचा (Ayurveda) वापर करण्याकडे अधिकाधिक वाढताना दिसत आहे. भारतीय खेळाडूंनीसुद्धा आयुर्वेद आणि भारतीय आहारशास्त्र यांचा वापर दैनंदिन जीवनशैलीमध्ये अंतर्भूत करून आपली कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करावा.

आज खेळाडूंना कृत्रिम प्रथिने (Protein Supplements) आणि कर्बोदकांचे (Carbohydrate) विशेष आकर्षण आहे. ते कृत्रिम पोषणातून मिळते, असं त्यांना वाटत आहे. मात्र, ही कृत्रिम पोषणपद्धती हानिकारक आहेच; पण ती नैसर्गिक घटकांना कधीच पर्याय ठरू शकणारी नाही. प्रस्तुत लेखमालेतून त्याबाबतची जागृती, माहिती आणि आहारासोबतच संपूर्ण शरीर आणि मनाच्या आरोग्याबाबतही आपण जाणून घेणार आहोत. आजच्या लेखात आपण आहारविषयक काही गोष्टींचा उलगडा करूयात.

खेळाडूंचा आहार कसा असावा?

तुम्ही घेत असलेला आहार हे एक प्रकारचे इंधन असते. प्रत्येक क्रीडा प्रकारातील प्रत्येक खेळाडूंना नियमितपणे अशाप्रकारच्या ऊर्जारूपी इंधनाची गरज असते. त्यामुळे खेळाडूंनी आहाराबाबत सजग, जागरूक राहणे आवश्यक असते. या आहारातून पुरेशी ऊर्जा मिळवितानाच, त्यातून कोणतेही दुष्परिणाम होऊ नयेत, याची काळजी घेणे आवश्यक असते.
आपल्या आहारातून कर्बोदके (carbohydrate), प्रथिने (Protein), चरबी (Fat), भाज्या व फळांमधला चोथा (Fibre), जीवनसत्त्वे (Multivitamins), खनिजे (Minerals) आणि पाणी (Water) इत्यादी बाबी पुरेशा प्रमाणात शरीराला मिळायला हव्यात. यापैकी कोणताही घटक असंतुलित (प्रमाण कमी किंवा अधिक) झाला, तर याचा परिणाम तुमच्या कामगिरीवर पडू शकतो.

See also  सव्याज परतफेड! झिंबाब्वेला १०० धावांनी चिरडले!!

भारतीय आहारशास्त्रामध्ये सर्व प्रकारची ऊर्जा पुरविणारे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. उदा. कडधान्यांमधून अ, ब, क आणि ई जीवनसत्त्वे मिळतात. त्यामध्ये पोटॅशियम, लोह आणि जस्त यांसारख्या खनिजांचे प्रमाणही चांगले असते.
तांदूळ आणि विविध पिठे शरीराला आवश्यक कार्बोहायड्रेट, प्रथिने आणि फायबरचा वापर पूर्ण करायला मदत करतात.
यांवर क्रीडा संघटना, क्रीडातज्ज्ञ, आरोग्यतज्ज्ञ व आहारतज्ज्ञ यांनी केलेले एकत्रित प्रयत्न देशाचे जागतिक स्पर्धांमधील वर्चस्व वाढवण्यात मदतीचे ठरेल.

पुरुष आणि स्त्री खेळाडू

निसर्गाने पुरुष आणि स्त्रियांच्या शरीराची रचना काहीशा फरकाने वेगळी केली आहे. दोघांच्याही मांस (Muscular Tissue), मेद (Fat) आणि अस्थि (Bones) यांच्या प्रमाणात आणि संरचनेमध्ये फरक आहे. त्यासापेक्ष घटकांचा ऊहापोह पुढील लेखांमध्ये करूयात.

स्त्रियांचा आहार आणि पुरुष खेळाडूंचा आहार यात थोड्याफार प्रमाणात फरक पडू शकतो. याशिवाय खेळाडूंचे वय, त्यांच्या खेळाचा प्रकार, हवामान (Season) यावर त्यांचा आहार अवलंबून असायला हवा. मात्र, आपल्याकडे सरसकट सर्वांनाच समान प्रकारचा आहार घेण्याचा सल्ला देण्यात येतो. यासोबतच शहरी भागातील आणि ग्रामीण भागातील आहार व पोषण मूल्यांमध्येही फरक बघायला मिळतो.

वरील सर्व गोष्टींची काळजी केवळ खेळाडूंनीच नव्हे, तर त्यांचे प्रशिक्षक, पालक, क्रीडा संस्था (Sports Academy), शासकीय यंत्रणा (Govt Authorities) यांनीही घेणे गरजेचे आहे.
नियमित आहार घेताना काय काळजी घ्यावी!

शरीराच्या पोषणाची सर्व प्रकारची गरज आपण शाकाहारी अथवा मांसाहारी पदार्थांमधून सहजपणे मिळवू शकतो. वर्तमानकाळात कृत्रिमरीत्या ऊर्जापूरक घटकांचा (Energy Supplements) वापर वाढत चालला आहे. यामुळे शरीराचे आवश्यक पोषण होते की नाही, हा संशोधनाचा विषय आहेच; पण त्यातून निर्माण होणाऱ्या भविष्यातील दुष्परिणामांचा तुम्ही विचार करायला हवा. याचा तुम्ही जो क्रीडाप्रकार खेळत आहात, त्यावरही अत्यंत विपरीत परिणाम होतो. यामुळे शरीराचा ऱ्हास होणे (wear & tear), एकाग्रतेत अडथळा निर्माण होणे (lack of confidence), आत्मविश्वास कमी वाटणे (low confidence) आदी अनेक प्रकारचे दुष्परिणाम संभवतात.

See also  सूर्या चमकला; श्रीलंकेला ४३ धावांनी नामविले

खेळाडूंनी घ्यावयाची विशेष काळजी

1) सर्वप्रथम आपले शरीर, वय, खेळाचा प्रकार आणि त्या अनुषंगाने असणारी गरज याची परिपूर्ण माहिती घ्या.
2) आपल्या आसपास असलेले खेळाडू काय खातात आणि काय करतात याकडे लक्ष न देता आपल्या शरीराला काय आवश्यक आहे त्याकडे लक्ष देऊन त्याप्रमाणे आहार-विहार असावा.
3) आपल्या खेळासाठी आवश्यक असलेल्या शरीरातील पोषणाकडे तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन त्याप्रमाणे आहार ठेवणे आवश्यक.
4) कृत्रिम ऊर्जापूरक घटकांचा वापर न करता नैसर्गिक पदार्थांद्वारेच शरीराचे पोषण कसे केले जाईल, याकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे.
5) कोणत्याही प्रकारचे व्यसन, अनिश्चित जीवनपद्धती, कोणत्याही पदार्थांचे अनिर्बंध सेवन टाळावे.

एकाग्रतेसाठी आवश्यक बाबी

कोणत्याही क्रीडा प्रकारात एकाग्रता फार महत्त्वाची असते. एकाग्रता निर्माण करण्यासाठी खालील बाबींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते.
१) दैनंदिन जीवनपद्धती
२) सराव, आहार आणि पोषण
३) पुरेशा पाण्याचे सेवन किंवा हायड्रेशनकडे लक्ष.
४) श्वासाचे व्यायाम
५) कमीत कमी साखर आणि फास्टफूड विरहित आहाराचे सेवन.
जाता जाता, एक सांगवंसं वाटतं की, तुमच्या आयुष्यात तुम्ही सतत ‘जिंकायचंच आहे’ याच आत्मविश्वासाने वाटचाल करणे आवश्यक आहे. मग जिंकण्याच्या मार्गावरून जाताना ज्या-ज्या गोष्टी आवश्यक असतील त्या सर्व गोष्टी समजून घेणे आणि त्याप्रमाणे कृती करणे आवश्यक असते.

आज आपण आहाराबद्दल प्राथमिक माहिती घेतली. पुढील लेखात तुम्हाला अशीच आणखी उपयुक्त माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. तुम्हाला खूप शुभेच्छा!

लेखिका : डॉ. आरती व्यास

 आयुर्वेद व आहार तज्ज्ञ, पुणे.
सेल नंबर : 9921320001