महाराष्ट्र आणि ज्यूदो खेळ एक सिंहावलोकन!

भारतातील ज्यूदो फेडरेशनची स्थापना १९६५ साली प्रामुख्याने मुंबईच्या सर्वश्री एल. के. डागा, मोएझ मोहम्मदअली, पुण्याच्या दीपक टिळक, बाळ देवकर यांसह महाराष्ट्रातीलच पण हैदराबाद येथे असणारे डॉ. एस. ए. पिसोळकर यांनी पुढाकार घेत केली. हे सर्व होण्याआधी खूप काळ न्यायालयीन कामकाजात गेला होता. पण नंतर फेडरेशनच्या अध्यक्षपदी जांबुवंतराव धोटे यांच्यानंतर श्री. जगदीश टायटलर यांची, तर मुंबईच्या श्री. एल. के. डागा यांची सरचिटणीसपदी आणि श्री मोएझ मोहम्मदअली यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड झाली. डॉ दीपक टिळक हे बराच काळ राष्ट्रीय संघटनेच्या तांत्रिक समितीचे आणि संघटनेचेदेखील पदाधिकारी होते. फेडरेशनची स्थापना झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय ज्यूदो महासंघ (आय.जे.एफ.) तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटना (आय.ओ.ए.) आणि भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाशी सातत्याने संपर्क साधत ज्यूदोला ओळख, संलग्नत्व आणि प्रतिष्ठा मिळवून दिली, पर्यायाने सरकार दरबारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय ज्यूदोला ‘अधिकृत क्रीडा प्रकार’ म्हणून मान्यता मिळाली.

वर्ष १९७२ मध्ये महाराष्ट्रातील ज्यूदोला आणखी प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी जपानच्या ‘कोदोकान विद्यापीठात’ ज्यूदोच्या उच्च प्रशिक्षणासाठी आपल्या राज्यातील अनेक खेळाडू गेले. या खेळाडूंनी तेथील अद्ययावत तंत्र शिकून घेत तेथील ब्लॅक बेल्ट प्राप्त केला आणि पुढे राज्यातील ज्यूदोच्या प्रचार–प्रसार कार्यास गती मिळवून दिली. वर्ष १९७२ नंतर महाराष्ट्रात ज्यूदोच्या राज्यस्तरीय खुल्या स्पर्धा घेणे नियमितपणे सुरू झाले. या स्पर्धा आयोजनामुळे जिल्हा व राज्य पातळीवर गुणवंत खेळाडू तयार झाले आणि त्यांनी राष्ट्रीय स्तरावर राज्याचा दबदबा निर्माण केला. उल्लेखनीय आहे की वर्ष २०२३ हे खुल्या ज्यूदो स्पर्धांचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.

वर्ष १९७६ मध्ये एनआयएस, पतियाळा येथे तज्ज्ञ जपानी ज्यूदो प्रशिक्षकांच्या साहाय्याने आणि भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या मदतीने राष्ट्रीय ज्यूदो कोचिंग डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू केला गेला. श्री. राजकुमार पुनकर (अमरावती) आणि श्री. पुरुषोत्तम चौधरी (नागपूर) हे या पतियाळा संस्थेतून यशस्वी झालेले राज्यातील पहिले विद्यार्थी-खेळाडू आहेत. यानंतर फेडरेशनने ज्यूदोचा अभ्यासक्रम, स्पोर्टिंग कोड, ‘नॅशनल डिप्लोमा इन ऑफिशिएटिंग’ जी अधिकृत राष्ट्रीय पंच होण्याची ‘पात्रता-परीक्षा’ आहे, त्याची तयारी करणे यावर लक्ष दिले. या कामात मुंबईच्या श्री. खुर्शिद पस्ताकिया, जे की त्यावेळी तांत्रिक समिती सचिव होते त्यांचा मोठा सहभाग आहे.

See also  सेहवागचे चिमटे अन् सचिनची तंबी!

राज्यातील ज्या खेळाडूंना जपानला जाता येत नव्हते, त्यांच्यासाठी श्री. एल. के. डागा यांनी मुंबई येथे १९८० च्या दशकामध्ये कोदोकान येथील प्रतींनिधींना आमंत्रित करून कोदोकान विद्यापीठातर्फे ज्यूदोचे शिबिर आयोजित केले आणि भारतातील खेळाडूंना नवे तंत्र शिकण्याची संधी प्राप्त करून दिली, तर पुण्यामध्येही अशाच प्रकारे श्री. दीपक टिळक यांनी जपानी प्रशिक्षकांना आमंत्रित केले आणि राज्यातील अनेक खेळाडूंना या तज्ज्ञ प्रशिक्षण शिबिराचा लाभ करून देण्यात आला.
१९८४ मध्ये IOA (भारतीय ऑलिंपिक संघटना) यांना ज्यूदोची प्रात्यक्षिके दाखविल्यानंतर ज्यूदोला मान्यता दिली गेल्याचे श्रेय मुंबईच्या कावस बिलिमोरिया यांना जाते, कारण त्यांनी श्री. राजीव गांधी यांच्या जवळचे श्री. डोसू गांधी (जे कावसचे काका आहेत) यांच्यासोबत प्रयत्न सुरू केले होते.

श्री. राजीव गांधी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि अखेरीस ते भारताचे पंतप्रधान झाले. श्री. राजीव गांधी यांनीच श्री. जगदीश टायटलरची ओळख करून दिली, जे नंतर ज्यूदो फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून नेमले गेले. विविध आंतरराष्ट्रीय संघटनांवरदेखील हळूहळू भारतीय आपला जम बसवू लागले आणि श्री. एल. के. डागा यांनी ज्यूदो युनियन ऑफ एशियाचे जनरल सेक्रेटरीपद भूषविले, तर वर्ष २००५ पासून श्री. मनोहर बंगेरा यांची ज्यूदो युनियन ऑफ एशियातर्फे रेफरिंग कमिशनचे ज्यूरी म्हणून नेमणूक झाली. श्री. जगदीश टायटलर आणि श्री. एल. के. डागा यांची JUA चे अध्यक्ष आणि सरचिटणीस म्हणून १९९५-२००० मध्ये निवड झाली.

१९८६ यावर्षी ज्यूदो फेडरेशनला आंतरराष्ट्रीय ज्यूदो फेडरेशन आणि ज्यूदो युनियन आशियाद्वारे सदस्यत्वाची मान्यता मिळाली आणि म्हणूनच त्यानंतर वर्ष १९८६ च्या सेऊल या दक्षिण कोरियाच्या शहरमधील आशियाई खेळात भारताने भाग घेतला. हे भारताचे पहिले यशस्वी आंतरराष्ट्रीय प्रदर्शन होते, कारण या स्पर्धेत भारताने ४ कांस्यपदके जिंकली. या पदकांमध्ये महाराष्ट्राच्या कावस बिलिमोरिया हे कांस्यपदक मिळविणाऱ्यांपैकी एक होते. त्या भारतीय संघात कावस यांच्या शिवाय आणखी तीन महाराष्ट्रीयन होते ते म्हणजे राष्ट्रीय ज्यूदो संघाचे मुख्य प्रशिक्षक, मुंबईचे श्री. आर. डब्ल्यू. पाटील आणि पुण्याचे दोन खेळाडू सर्वश्री राजेंद्र गांधी आणि नितीन राक्षे.

”1882 साली सर्वांना ज्यूदो शिकवण्यासाठी कोदोकानची स्थापना केलेल्या ज्यूदोचे उद्गाते डॉ. जिगोरो कानो म्हणतात की, ज्यूजुत्सू आणि ज्यूदो हे शब्द प्रत्येकी दोन चिनी वर्णांनी लिहिलेले असून, दोन्हीमधील ‘ज्यू’ शब्द समान आहे आणि याचा अर्थ “सौम्य, सभ्यता” किंवा “मार्ग देणे.” ‘जुत्सू’चा अर्थ “कला, सराव” असा आहे आणि दो म्हणजे “तत्त्व” किंवा “मार्ग,” हा मार्ग हा शब्द म्हणजे जीवनाची संकल्पना. ज्यूजुत्सूचे भाषांतर “सौम्य कला” असे तर ज्यूदोचे “सौम्यतेचा, सभ्यतेचा मार्ग” असे होऊ शकतो. ज्यूदो ही जशी आक्रमण आणि बचावाची कला आहे, तसाच तो जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. ज्यूदो हे केवळ लढाऊ तंत्र शिकण्यापेक्षा म्हणाजे स्वसंरक्षणापेक्षाही आणि बरेच काही आहे. कारण ही एक शारीरिक, बौद्धिक आणि नैतिक शिक्षणाची एक अद्भुत प्रणाली आहे. जगभरातील राष्ट्रीय संघटनांच्या संदर्भात, ज्यूदो हा जगातील सर्वात मोठ्या खेळांपैकी एक असून, आंतरराष्ट्रीय ज्यूदो फेडरेशनमध्ये सर्वाधिक सदस्य राष्ट्रे आहेत.”
– जिगोरो कानो

महाराष्ट्राला मिळालेल्या पदकांमध्ये पहिले आंतरराष्ट्रीय ‘सुवर्ण पदक’ पटकावण्याचा मान पुण्याच्या अनिल उणेचा याला जातो. इजिप्त येथे जागतिक बाल व कुमार ज्यूदो स्पर्धा (वर्ल्ड ज्युवेनाईल ज्यूदो चॅम्पियनशिप) मध्ये अनिलने वर्ष १९८८ मध्ये सुवर्णपदक पटकावले. या संघाला प्रशिक्षण देण्यासाठी पुण्याच्या आंतरराष्ट्रीय पंच आणि यशस्वी राष्ट्रीय खेळाडू श्री. शैलेश टिळक यांची नियुक्ती झाली होती, तर प्रमुख राष्ट्रीय प्रशिक्षक होते मुंबईचे श्री. आर. डब्ल्यू. पाटील. अमरावतीच्या डॉ. सतीश पहाडे यांची तर भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून अनेक वर्षे नियुक्ती झाली होती. त्यांच्या तंत्राने विकसित झालेले अनेक खेळाडू पदक प्राप्त आहेत. अभिमानाची बाब म्हणजे आज भारतातील अत्यंत लोकप्रिय, अनुभवी आणि कौशल्याचे आगार असलेलेला व भारतीय ज्यूदोपटूंचा लाडका राष्ट्रीय प्रशिक्षक ही श्री. सतीश पहाडे यांची ओळख आहे. वर्ष १९८९ मध्ये नवीनचंद्र मोरे (अहमदनगर) याने रौप्यपदक मिळवले. नवीनचंद्राच्या बरोबर पुण्याच्या निखिल सरनाईक याचीही भारतीय संघात १९८९ आणि १९९० साली वर्णी लागली होती. वर्ष १९८८ मध्ये इजिप्त येथील स्पर्धांसाठी राष्ट्रीय कुमार संघाचा प्रशिक्षक म्हणून माझी नियुक्ती फेडरेशनचे सरचिटणीस श्री. एल. के. डागा यांनी मी नवोदित असूनदेखील केली होती. त्यानंतर लगेचच १९८९ मध्ये संघाच्या प्रशिक्षकपदी पुनश्च एकवार माझी नियुक्ती झाली.

See also  भारतीय खेळाडू करताहेत जग पादाक्रांत!

१९९० साली रशियाच्या त्वेर येथे आयोजिलेल्या ‘आमंत्रित कुमार गटाच्या जागतिक ज्यूदो स्पर्धेत’ राज्याच्या दोन खेळाडूंनी सहभाग घेतला. हे खेळाडू होते कोल्हापूरचा विरधवल पाटोळे आणि औरंगाबादचा राहुल जोगळेकर. यात विरधवलने सुवर्ण पदक मिळवले. सदरील स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या श्री. अण्णासाहेब पाटोळे यांच्यासह माझीही निवड संघ प्रशिक्षक म्हणून झाली होती.

                                                                                  लेखक : दत्ता आफळे

                                                                                                     (लेखक ज्यूदो राज्य तांत्रिक
                                                                                                         समितीचे सचिव आहेत.)